fbpx

Exclusive : मनपा निवडणुकीच्या मैदानात उतरणार युवाशक्ती

जळगाव लाईव्ह न्युज । चेतन वाणी । १४ जून २०२१ । जळगाव शहर मनपा राजकीय उलथापालथ गेल्या काही महिन्यांपासून फार जोमाने सुरू आहे. मनपा निवडणुकीला अद्याप अडीच वर्ष बाकी असले तरी प्रत्येक पक्षाकडून पक्ष बांधणीच्या कामाला वेग देण्यात येत आहे. जळगाव मनपात आजवर असलेले तेच तेच जेष्ठ चेहरे बदलून टाकण्यासाठी युवाशक्ती एकवटली असून लवकरच दोन ते तीन नवीन पक्षांची नोंदणी देखील केली जाणार आहे. जिल्हपुरते मर्यादित असलेल्या हे पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरल्यावर दिग्गजांना नक्कीच शह मिळणार यात तीळमात्र शंका नाही.

जळगाव मनपामध्ये गेल्या तीस वर्षांचा राजकीय लेखाजोखा तपासला असता बहुतांश चेहरे तेच आहेत. गेल्या दहा वर्षात नवीन चेहरे उदयास आले असले तरी जवळपास प्रत्येकाला काही ना काही राजकीय पार्श्वभूमी आहे. जिल्ह्याच्या जुन्या-जाणत्या नेत्यांच्या वैयक्तिक वादामुळे आजवर शहराचा विकास खुंटलेला आहे. मनपात देखील तेच चेहरे असल्याने पक्ष कोणताही असो परंतु विकास दिसून येत नाही. मनपातील काही नव्या सुशिक्षित आणि अभ्यासू चेहऱ्यांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केली तरी आपल्या वडीलधाऱ्या ज्येष्ठ सदस्यांपुढे त्यांना फारसे विचारात घेतले जात नाही किंबहुना ते सदस्य आपले विचार मांडू शकत नाही अशी परिस्थिती आहे. शहराचे राजकारण चालवणारे काही मोजके चेहरे हेच आपला मनमौजी कारभार चालवतात.

mi advt

जळगाव मनपात अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या राजकीय नेत्यांना शह देण्यासाठी युवाशक्ती एकवटली आहे. प्रत्येक प्रभागात तरुण, तडफदार, भ्रष्टाचार न करणारा, स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार देण्यासाठी युवकांची चाचपणी सध्या सुरू आहे. जळगावात युवकांकडून जिल्ह्यापुरती मर्यादित असलेल्या पक्षाच्या नोंदणीसाठी देखील प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आले असून लवकरच त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. शहरात सध्या युवकांचे ४-५ गट आपल्या संस्थांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित असून पुढेही समाजकारणाचा वसा घेऊन राजकारणात उतरण्याचा त्यांचा मानस आहे. शहरातील हे चार-पाच गट तूर्तास तरी एकत्र येण्याची शक्यता कमी असली तरी निवडणुकीच्या ऐन हंगामात या युवकगटाच्या प्रमुखांकडून प्रभाग निहाय उमेदवार वाटले जाण्याची शक्यता आहे. 

युवकांनी शहराच्या विकासासाठी बांधलेला हा निर्धार पुढेही याच जोमाने कायम राहील जर त्यांना ज्येष्ठांनी मोठ्या मनाने स्वीकार केले तर तरच ते होऊ शकते  आपल्याकडील जेष्ठ इतक्या मोठ्या विचारांचे नसल्याने तरुण विरुद्ध जेष्ठ अशीच चुरशीची लढत काही प्रभागात पाहायला मिळेल यात शंका नाही. नवीन पक्षांची नोंदणी पूर्ण होताच तरुणांकडून याबाबत जाहीर माहिती दिली जाईल. तरुणांच्या या गटाला माजी नगरसेवकांचा देखील पाठिंबा आहे. युवा नगरसेवकासाठी तरुणांकडून खेळला गेलेला हा डाव यशस्वी झाला तर येणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भावी सदस्य हे युवकच असतील हे मात्र निश्चित आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज