हृदयद्रावक : पाेलिस बनण्याचे स्वप्न राहिले अधुरे, विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । बोदवड येथील उर्दू शाळेजवळील माळी गल्लीत राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा वीज पंपाचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी घडली. अतुल राजू माळी असे मृत तरुणाचे नाव असून अतुलचे पाेलिस बनण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत असे की, बुधवारी सकाळी आठ वाजता माळी गल्लीत नळाला पाणी आले. अतुलची आई शेतात कपाशी वेचण्यासाठी गेली. परवा अतुलचा पोलिस भरती परीक्षेचा पेपर असल्याने त्याने पाण्याची मोटर सुरू करून आपले बूट व चप्पल धुवून ठेवले. मोटार बंद केल्यानंतरही त्यात विजेचा प्रवाह उतरला हाेता. शेजारीच भरलेल्या पाण्याच्या घमेल्यात तो वीज पंपासह पडल्याने पाण्यात प्रवाह उतरल्याने अतुलचा जागीच मृत्यू झाला.

दुपारी तीन वाजता येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ.महेश वारगळे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात अतुलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात वृद्ध आजी, आई, एक भाऊ व एक विवाहित बहीण असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त हाेत आहे. या प्रकरणी येथील पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

दरम्यान, अतुल वडिलांच्या निधनानंतर आई, लहान भाऊ व बहीण यांना आधार देण्यासाठी पेपर वितरणाचे व इतर ठिकाणी काबाडकष्ट करून शिक्षणही सुरू ठेवले हाेते. आईनेही पती निधनाचे दुःख बाजूला सारून अतुलच्या शिक्षणासाठी शेतात मजुरी करून त्याला शिकवले. त्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने दोघा माय-लेकांचे प्रयत्न सुरू होते.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज