fbpx

तीन वर्षांपासून रखडले भुयारी रेल्वे मार्गाचे काम; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । जळगाव तालुक्यातील भादली रेल्वेस्थानकापासून जवळच असलेल्या गेट नंबर १५३ जवळ भुयारी रेल्वे मार्गाचे काम मंजूर असूनही गेल्या तीन वर्षांपासून हे काम बंद आहे. गेटही बंद असल्याने पलीकडे शेती असलेल्या शेतकऱयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत भुयारी रेल्वे मार्गाचे काम सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.

भादली रेल्वेस्थानकापासून जवळच असलेल्या गेट नंबर १५३ जवळ भुयारी रेल्वे मार्गाचे काम मंजूर झाले आहे. परंतु गेल्या तीन वर्षांपासून हे काम पूर्णतः बंद असून गेटही बंद करण्यात आलेला आहे. परिणामी पलिकडे शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून शेती करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

mi advt

१५ ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम
रेल्वे प्रशासनाने हे काम त्वरित सुरू करावे, अशी विनंती शेतकऱ्यांनी यापूर्वी देखील अर्जाद्वारे केली आहे. ९ जुलै २०२१ रोजी पुन्हा शेतकऱ्यांनी एक निवेदन देऊन २८, २९, ३० जुलै रोजी गांधीगिरी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर भुसावळ विभागाच्या मध्य रेल्वेचे बांधकाम अभियंता पंकज धाबारे यांनी सप्टेंबर अखेर काम सुरू करू, असे स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिद्ध केले होते. त्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी आंदोलन रद्द केले होते. मात्र, आता पावसाळा संपत आला तरीही या भुयारी मार्गाचे काम सुरु करण्यात आलेले नाही. दरम्यान, भुयारी मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी विनंती शेतकऱ्यांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत काम सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज