तीन वर्षांपासून रखडलेल्या ‘त्या’ भुयारी मार्गाच्या कामाला होणार सुरुवात

जळगाव लाईव्ह न्यूज । सुनील महाजन । भादली रेल्वे गेट येथे तयार करण्यात येत असलेल्या भुयारी मार्गाच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे काम बंदावस्थेत होते. रेल्वे गेट बंद असल्यामुळे गेटच्या दुसऱ्या बाजूला शेती असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. काम तातडीने सुरु करण्यात यावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठपुरावा करून आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून २५ नोव्हेंबरपासून या कामाला सुरुवात होणार आहे.

नशिराबाद येथून जवळच असलेल्या भादली रेल्वे स्टेशन जवळील गेट क्रमांक १५३ गेल्या तीन वर्षांपासून भुयारी मार्गाच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला आहे. गेट बंद असल्याने रेल्वे लाईनच्या दुसऱ्या बाजूला शेती असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे होणारे हाल लक्षात घेऊन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीकडून मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांच्याकडे भुयारी मार्गाचे काम सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर रेल्वेच्या बांधकाम विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांना लेखी पत्र दिले आहे. यात २५ नोव्हेंबरपासून कामास सुरुवात करण्यात येणार असून मार्च २०२२ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आंदोलनाचा दिला होता इशारा
भुयारी मार्ग होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शेतकरी २८ ते ३० जुलै रोजी भादली रेल्वे स्टेशनच्या बाजूला ‘गांधीगिरी आंदोलन’ करणार होते. दरम्यान, रेल्वे विभागाने २८ जुलै रोजी स्थानिक वृत्तपत्रात सप्टेंबर अखेर काम सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले होते. १५ ऑक्टोंबर २०१९ पर्यंत काम सुरू न झाल्याने पुन्हा आंदोलन करण्याचे कळविण्यात आले. त्यानंतर १८ ऑक्टोंबर रोजी मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज धाबारे यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी २५ नोव्हेंबर रोजी काम सुरू करणार असल्याचे पत्र दिले. शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्याचे फलित होतांना दिसत असून लवकरच शेतकऱ्यांच्या समस्या दूर होत असल्याने शेतकऱ्यांनी सायंकाळी विठ्ठल मंदिर येथे बैठक घेऊन आनंद व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांना रेल्वे विभागाने पत्र दिल्याने अनेकांनी महाजन यांचे आभार मानले.

शेतकऱ्यांमध्ये आनंद
भादली रेल्वे गेट बंद असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी भादली सब स्टेशनकडील गेट क्रमांक १५२ च्या रस्त्याने शेतात जावे लागत आहे. त्यासाठी त्यांना अधिक दोन ते तीन तास वेळ लागत होता. त्याच्या परिणाम शेती कामावर होत असल्याने उत्पन्नातही घट झाली होती. दरम्यान, मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील वर्षाच्या हंगामापूर्वी शेतकऱ्यांना जवळचा रस्ता रहदारीसाठी सुरू होणार आहे. केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज