मूलभूत सुविधा मिळत नसल्याने महिला धडकल्या पालिकेवर

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२१ । सावदा नगरपालीका हद्दित नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या सोमेश्वरनगर परिसरातील महिला मूलभूत सुविधा मिळत नसल्याने दि.२२ रोजी पालिकेत धड़कल्या. परिसरात अस्वच्छता, गटारी नसणे, दिवाबत्ती तसेच कचरा संकलन गाडी येत नसल्याने आक्रमक पवित्रा घेत मुख्याधिकारी यांनी या भागात येऊन पहाणी करावी, अशी भूमिका घेतली.

यावेळी आंदोलनकर्त्या महिलांची मागणी मान्य करून मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी काही कर्मचाऱ्यांसोबत या परिसरात जाऊन पाहणी केली. कचरा संकलन करणारी पालिकेची गाडी अनेक दिवसापासून येत नसल्याचे नागरीकांनी सांगितले. तसेच हा भाग पालिका हद्दित समाविष्ट होऊन जवळपास दोन वर्ष झाली आहेत. मात्र अद्यापपर्यंत बाहेरील भागासाठी दुपट्ट पाणीपट्टी नगरपालिका आकारत आहे. येथे शेवटच्या घरापर्यंत पाणी पोहचत नसल्याची तक्रार तक्रारही महिलांनी यावेळी केली. पालिका हद्दित समाविष्ट झाल्याने शहरातील पाणीपट्टी आकारणी करावी, याभागात असलेली पाताळ गंगा नदी जवळील अस्वच्छता तेथे उभारलेल्या माटीच्या बांधामुळे येथे पाणी साचते त्यामुळे तेथे त्वरीत स्वच्छता करून साचणाऱ्या पाण्यासाठी पुढे वाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, पथदिवे, पाणी पुरवठा याबाबत अनेकदा समस्या मांडल्या व अनेक वेळा या भागातील नागरीकांनी पालिकेस निवेदने दिले. त्यानंतरही या परीसरातील समस्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक राजेंद्र चौधरी, शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी व याभागातील महिला तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज