fbpx

व्यापाऱ्यांना मिळणार २९ वर्षाच्या दिर्घमुदतीने गाळे; प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । पाचोरा येथे उभारण्यात आलेल्या कै. के.एम. (बापु) पाटील व्यापारी संकुलातील गाळे दुर्घमुदतीने देण्याची व गाळ्यांचे भाडे कमी करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली होती. दरम्यान, यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारत्मक प्रतिसाद देत तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

पाचोरा येथील कै.के.एम. (बापु) पाटील व्यापारी संकुल उभारले आहे. मात्र यातील अटी शर्ती बाबत आक्षेप घेत हे गाळे दुर्घमुदतीने देण्याची मागणी काही व्यापारी बांधवानी केली होती. या गाळ्यांचे भाडे कमी करणे व सदरील गाळे दिर्घमुदतीने अर्थात २९ वर्षे कराराने देण्याबाबत पालिका प्रशासनास विनंती केली होती. दरम्यान व्यापारी बांधवांच्या मागणीची दखल घेत आ.किशोर पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा विषय मार्गी लावण्याची मागणी केली होती. आ.किशोर पाटील यांच्या विनंतीवरून ना. एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत ना. शिंदे यांनी गाळे दिर्घमुदतीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहे.

mi advt

नगरविकास विभागातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन स्वयंस्पष्ट अहवाल शासनास तात्काळ सादर करण्यासचे आदेश देण्यात आले आहेत व त्यानुसार पाचोरा पालिकेने तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. त्यामुळे आ. किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश येणार असून व्यापारी बांधवांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. बैठकीला आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल उपस्थित होते. तर नगरपालिका प्रशासनातर्फे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी डी.एस. मराठे हे ऑनलाईन उपस्थित होते. बैठकीत नवीन गाळ्याचे भाडे कमी करणे व गाळे दीर्घ मुदतीने भोगवटा ने देण्याकरिता सकारात्मक चर्चा झाली. ना. शिंदे यांनी हे गाळे दीर्घ मुदतीने देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगर पालिका प्रशासनास दिले आहे. यावेळी नगरविकास विभाग प्रधान सचिव भूषण गगराणी, विशेष कार्य अधिकारी कृष्णा जाधव, डॉ. राजेश कावडे, स्वीय सहाय्यक राजेश पाटील आदी उपस्थित होते.

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरही झाली चर्चा
दरम्यान, आ. किशोर पाटील यांनी ना. शिंदे यांचेकडे राज्यातील १९९३ पूर्वी सेवेत रोजंदारी कर्मचारी म्हणून दाखल झालेल्या सफाई कर्मचारी यांना वारसा हक्क देण्याबाबत मागणी केली होती. या मागणीला देखील ना.शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यामुळे पाचोरा नगरपालिकेच्या ६० कर्मचाऱ्यांसह
राज्यभरातील सफाई कामगार बांधवाना याचा लाभ मिळणार आहे.

शासनाकडून दिवाळी भेट
शासनाच्या या होऊ घातलेल्या ऐतिहासिक निर्णयाचा लाभ राज्यभरातील पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे धारक व्यापारी बांधवांना व सफाई कामगार बांधवांना होणार असून ही त्यांना शासनाकडून जणू दिवाळी भेट मिळणार आहे.
– आमदार किशोर पाटील

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज