..जेव्हा आमदार ट्रक चालक होऊन वसुलीबाज पोलिसांची पोलखोल करतात

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाट गेल्या काही दिवसांपासून अवजड वाहतुकीसाठी बंद असला तरी त्याठिकाणी पोलिसांकडून वसुली करीत अवजड वाहनांना परवानगी देण्यात येते. काही दिवसांपूर्वीच याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. बुधवारी रात्री १२ ते २ दरम्यान चाळीसगावचे आ.मंगेश चव्हाण यांनी अचानक स्टिंग ऑपरेशन राबविले. स्वतःच ट्रक चालक होऊन त्यांनी वसुली करणाऱ्या पोलिसांचे व्हिडीओ चित्रीकरण केले. ५०० रुपये देण्यास नकार दिल्याने पोलिसांकडून ट्रकचालक म्हणून आ.चव्हाण यांना शिवीगाळ केल्याचे देखील व्हिडिओत कैद झाले आहे. दरम्यान, पैसे वसुली करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्याची मागणी अधिवेशनात करणार असल्याचे आ.मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास आ.मंगेश चव्हाण हे स्वतः सहकाऱ्यांसह चारचाकीने कन्नड घाटात पोहचले. आ.चव्हाण यांनी घाटात चारचाकी थांबवून अगोदर ट्रक चालकांना विचारणा केली. जवळपास प्रत्येकाला ५०० ते १००० रुपयांची मागणी केल्यावर कमीतकमी २०० रुपये घेतल्यावर पोलीस सोडत असल्याची माहिती ट्रक चालकांनी दिली. इतकंच नव्हे तर पोलीस पैसे घेत असले तरी त्यांची भाषा शिवराळ असल्याची प्रतिक्रिया काही ट्रक चालकांनी दिली. गुजरातमध्ये असा प्रकार होत नसल्याचे ट्रक चालकांनी सांगितले.

ट्रक चालकांशी चर्चा केल्यावर आ.मंगेश चव्हाण यांनी एक ट्रक थांबवून स्वतः अजवड ट्रक चालवत कन्नड घाटात नेला. तोंडाला पूर्ण मफलर रुमाल बांधलेला असल्याने त्यांना कुणीही ओळखले नाही. घाटात असलेला झिरो पोलीस आणि इतर पोलिसांनी ट्रकचालक आ.मंगेश चव्हाण यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली. आमदार पोलिसांना म्हणाले की, ‘थोडे कमी करा’ अन् ५०० रुपये पोलिसांच्या हातात दिले. तसेच ‌उर्वरित पैसे परत मागितले असता त्या पोलिसाने १०० रुपये परत दिले. आणखी १०० रुपये परत मागितले असता पोलिसाने केवळ ५० रुपये परत दिले. आमदारांनी आणखी आग्रह करीत बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले व हा बाकी पैसे परत देत नसल्याचे सांगितले, तेव्हा त्यातील एक पोलीस शिवीगाळ करायला लागला मग आमदार मंगेश चव्हाण यांनी खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांनी आमदारांना ओळखले व त्यांनी पळ काढला.

दोन दिवसात निलंबन न केल्यास गृहमंत्र्यांना जाब विचारणार

आमदार मंगेश चव्हाण यांनी खाली उतरून बाजूला एका धाब्यावर बसलेल्या पोलिसांना याबाबतचा जाब विचारला असता ते समर्पक उत्तर देऊ शकले नाही. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि कर्मचारी यांना मी वारंवार सांगितले कि तालुक्यात गुरे चोरीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. गुरे चोरी रोखण्यासाठी काहीतरी पाऊले उचला असे त्यांना सांगितले असता शेतकऱ्यांसाठी पोलिसांना वेळ नाही परंतु वसुली करायला वेळ आहे. आजचे सर्व व्हिडीओ मी अधिकाऱ्यांना देणार असून येत्या दोन दिवसात जर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली नाही तर यासंदर्भात मी पोलीस महासंचालकांकडे बसून गृहमंत्र्यांना याचा जाब विचारणार असल्याचे आ.मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

पहा स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज