fbpx

पुढील ५ दिवस पावसाचे ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्युज | २६ ऑगस्ट २०२१ | पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागात पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

देशात सध्या अनेक ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. त्यामुळे दक्षिण भारतासह उत्तरेकडील काही राज्यांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील विविध भागात पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यामुळे खरीप पिकांना जीवनदान मिळाले होते. त्यानंतर गेल्या ४ ते ५ दिवसापासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, आता पुढील पाच दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, हवामान विभागानं महाराष्ट्रात आज रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सागंली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

27 ऑगस्ट  : महाराष्ट्रात उद्या प्रामुख्यानं पूर्व विदर्भाला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी देखील मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

28 ऑगस्ट : वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात यादिवशी इतर जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो.

29 आणि 30 ऑगस्ट : प्रादेशिक हवामान विभागानं राज्यात 29 आणि 30 ऑगस्टला राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊ शकतो.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज