खासदारांच्या शहरातच पोलीस कुटुंबियांना करावी लागतेय पाण्यासाठी भटकंती

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । चाळीसगाव बस स्थानकामागील पोलिस वसाहतीचा पाणी पुरवठा खंडित झालेला असून सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेकडे तक्रार करूनही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. परिणामी या वसाहतीतील पोलीस कर्मचारी व कुटुंबियांना गेल्या १७ दिवसांपासून पाणी नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

चाळीसगाव बस स्थानकामागे असलेल्या पोलिस वसाहतीत जवळपास २० कुटुंब वास्तव्यास असून ही वसाहत सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येते. दरम्यान, या ठिकाणी नगरपालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो, मात्र १३ ऑक्टोबरपासून या वसाहतीचा पाणीपुरवठा खंडीत झालेला असून तक्रारी करूनही अद्यापपर्यंत हा पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. १७ दिवसांपासून पाणी नसल्याने पोलिस कुटुुंबीयांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून या कुटुंबियांना पाणी विकत घेऊन गरज भागवावी लागत आहे.

यंत्रणांनी केले हातवर
पाणी पुरवठा बंद झाल्याच्या एक-दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेकडे विचारणा केली. मात्र दोन्ही ठिकाणी ‘हे आमचे काम नाही’ असे सांगून यंत्रणांनी हात वर केले आहेत. पोलिस बांधवांच्या तक्रारीची कुणीच दखल घेत नसल्याने जायचे कुणाकडे? व ऐन दिवाळीच्या ताेंडावर आणखी किती दिवस पाण्यावाचून राहायचे असा प्रश्न या कुटुंबियांकडून उपस्थित केला जात आहे.

पाईपलाईन लिकेज
या पोलीस वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनचे काम सुरू असल्याने या पाइपलाइनला न्यायालयाजवळ लिकेज झाल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु त्यामुळे पोलिस वसाहतीतील पाणीपुरवठा १७ दिवसांपासून ठप्प झाला आहे. याबाबत संबंधित यंत्रणेने दुरुस्ती करण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज