मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचेकडील दि.२० ऑक्टोबर रोजीच्या पत्रानुसार जळगाव जिल्ह्यामध्ये दि. १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते. पुनरिक्षण कार्यक्रमाची माहीती देतांना जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले की, एकत्रीकृत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी दि.१ नोव्हेंबर रोजी होणार असून त्यावरील दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि.१ नोव्हेंबर ते दि.३० नोव्हेबर असा असणार आहे. विशेष मोहिमांचा कालावधी दि.१३ व दि.१४ नोव्हेंबर व दि.२७ व दि.२८ नोव्हेंबर असा असणार आहे. दावे व हरकती दि.२० डिसेंबरपर्यंत निकालात काढणे, मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दि.५ जानेवारी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी नमूना नं. ६, मयत मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार यांचे मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी नमूना नं. ७, मतदार यादीतील नावांची किंवा तपशीलाची दुरुस्ती करण्याकरिता नमूना नं.८, मतदार संघामध्ये स्थलांतर झाले असल्यास नाव नोंदणीकरिता नमूना नं. ८ अ सादर करता येणार आहेत. जिल्ह्यातील रहिवाश्यांनी दि.१ ते दि.३० नोव्हेंबर या कालावधीमध्ये योग्य तो फॉर्म-नमुना नोंदविण्याचे तसेच मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज