निवडीपूर्वीच लागले लेबल.. नगरसेवक विराज कावडिया

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२१ । शहर मनपामध्ये शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून अनेकांची भाऊ गर्दी झालेली असताना पक्षश्रेष्ठींकडून विराज कावडिया यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या महासभेत कावडियांच्या प्रस्तावावर निर्णय झाला नसल्याने त्यांचे पद अद्याप हवेतच आहे. आपली निवड झालेली नसतानाही कावडिया यांनी मात्र फेसबुकवर नगरसेवक पदाचे लेबल लावले आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अमर जैन यांनी राजीनामा दिल्यानंतर ते पण अद्यापही रिक्तच आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून अनेक नावांची चर्चा होती. त्यातच जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना संधी मिळावी अशी मागणी जोर धरत होती.

महिनाभरापूर्वी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या आदेशानुसार महानगर प्रमुख शरद तायडे यांनी विराज कावडीया यांचे नाव स्वीकृत नगरसेवक पदासाठी निश्चित झाल्याचे जाहीर केले होते. स्वीकृत नगरसेवक म्हणून महासभेसमोर ठराव ठेवल्यानंतर त्याला मंजुरी मिळाल्यावर निवड ग्राह्य धरण्यात येते. नुकतेच महापालिकेची महासभा पार पडली असून त्यात कावडिया यांच्या निवडीचा कोणताही निर्णय झाला नाही.

सध्या शिवसेनेत शिवसैनिक म्हणून विराज कावडिया धडाडीची भूमिका बजावत असले तरी नगरसेवक म्हणून त्यांची निवड झालेली नाही. नगरसेवक पदाची माळ गळ्यात पडणार की नाही हे निश्चित नसले तरी कावडिया यांनी स्वतःच्या फेसबुक अकाउंटवर विराज अशोक कावडिया (नगरसेवक) असा उल्लेख केला आहे.

क्रिकेट आणि राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. पक्षाकडून ग्रीन सिग्नल मिळाला असला तरी पुढील मार्ग मात्र मोकळा झालेला नाही. पक्षाच्या आदेशाविरोधात कावडिया यांनी नगरसेवक पदाचा शिक्का जोडून घेतला असल्याने काही जुने आणि जेष्ठ शिवसैनिक देखील नाराज झाले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -