मिशन युवा स्वास्थ्य अभियानातून लसीकरण करुन घेण्यासाठी विद्यापीठाकडून आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । राज्यातील महाविद्यालयीन युवक-युवतींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मिशन युवा स्वास्थ्य मोहिम राबविण्यात येत असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तातडीने लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले आहे.

राज्यातील महाविद्यालयांना २० ऑक्टोबर पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून तासिका करण्यास परवानगी दिली आहे. महाविद्यालयात उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे लसीकरण आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत मिशन युवा स्वास्थ्य अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी लस आणि लसीकरणासाठी आवश्यक कर्मचारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने उपलब्ध करुन दिले जात आहेत.

उच्च तंत्र शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने या अभियानाला प्रारंभ झाला असून या अभियानांतर्गत महाविद्यालय परिसरातच लसीकरण केले जात आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील अनेक महाविद्यालयांमध्ये लसीकरण मोहिम सुरु झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पहिला अथवा दुसरा डोस घेतलेला नाही त्या विद्यार्थ्यांनी तातडीने लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे महाविद्यालय अथवा विद्यापीठाच्या तासिका, प्रात्यक्षिके आणि इतर शैक्षणिक उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागी होता येईल. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शिकत असलेल्या महाविद्यालयात किंवा जवळच्या महाविद्यालयात अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रात लसीकरण करुन घ्यावे आणि लसीकरण झाल्यानंतर महाविद्यालयास त्याबाबतची माहिती अवगत करावी.

आपल्या मित्र-मैत्रीणींना देखील विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे आणि शैक्षणिक उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी व्हावे असे आवाहन प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार व प्रभारी कुलसचिव प्रा.आर.एल.शिंदे यांनी केले आहे. विद्यापीठाने या मोहिमेच्या जनजागृतीचा भाग म्हणून प्रवेशित विद्यार्थ्यांच्या उपलब्ध भ्रमणध्वनीवर संदेश पाठवून लसीकरण करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज