दुर्दैवी : पुत्राच्याच ट्रॅक्टरखाली पित्याचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२१ । कुटुंबियांसोबत मध्यप्रदेशात ऊसतोडणीसाठी जात असलेल्या ५० वर्षीय पुरुषाचा ट्रॅक्टरवरून तोल जाऊन त्याच ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना लोहारी बुद्रूक गावाजवळ घडली. लुकमान उस्मान पठाण (रा. नेरी, ता.पाचोरा) असे मृताचे नाव असून त्यांचा मोठा मुलगा हे ट्रॅक्टर चालवत होता.

पाचोरा तालुक्यातील नेरी येथील लुकमान उस्मान पठाण (वय-५०), हे आपल्या कुटुंबासोबत मध्यप्रदेशात ऊसतोडणीला जात होते. रविवार दि.१७ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास ते नेरी येथुन पहुरमार्गे ते मध्यप्रदेशात जाण्यासाठी निघाले होते. त्यांचा मोठा मुलगा बबलु लुकमान पठाण हा ट्रॅक्टर चालवत होता. लोहारी गावाजवळ ट्रॅक्टरमधील साहित्यावर बसलेले लुकमान पठाण यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले. त्याचवेळी ट्रॅक्टरचे मोठे टायर त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने ते जागीच ठार झाले. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात नोंद होऊन शुन्य क्रमांकाने नोंद पिंपळगाव हरेश्वर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.

नेरी येथे सोमवार दि.१८ रोजी दुपारी लुकमान पठाण यांचा दफनविधी झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले व दोन मुली असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज