लग्नाच्या बहाण्याने उल्लू बनविण्याचा फंडा, २ लाखांपासून सुरुवात आणि चौथ्या दिवशी नवरी फरार 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । जळगावात केटरिंगचे काम करताना दोघांची ओळख झाली. त्यातच लग्न जुळवून देणाऱ्या दोघांशी परिचय झाला. लग्नासाठी मुली मिळत नसल्याची ओरड नेहमीच असल्याने एखादा गरजू सावज शोधायचा, कमीत कमी २ लाखांपासून सुरुवात करायची दागिने जमा करायचे आणि लग्न लावून द्यायचे. लग्नाच्या तिसऱ्या, चौथ्या दिवशी नवरी मुलीच्या बहिणीची तब्येत खराब असल्याचा बहाणा करीत माहेरची वाट धरायची आणि पळ काढायचा. जिल्ह्यात अनेकांना याच पद्धतीने चुना लावणाऱ्या चौघांच्या टोळीतील दोघांच्या मुसक्या एलसीबीच्या पथकाने आवळल्या आहेत.  दोघांना पुढील कार्यवाहीसाठी त्यांना भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून मुख्य संशयितांचा शोध सुरु आहे.

अलीकडच्या काळात लग्नासाठी मुली मिळत नसल्याने मुलांचे पालक फार चिंताग्रस्त असतात. विदर्भ आणि इतर प्रांतातील उपवर मुली शोधून देणारे दलाल देखील फार झाले आहे. मुलींच्या बहाण्याने फसवणूक करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. पोलिसांनी अनेकांना पकडले तरीही हे प्रकार सुरूच आहे. नुकतेच चाळीसगाव पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर एलसीबीने आणखी दोघांना अटक केली आहे. बहुतांशी बदनामीच्या भीतीपोटी गुन्हे दाखल केले जात नसल्याने ठगांचे फावले होते.

नवरदेवाला रेल्वेस्थानकावर मारहाणनंतर प्रकार उघड

भडगाव येथील एका तरुणाचे एका मुली सोबत लग्न लावून देवून त्यांचकडून पैसे घेण्यात आले होते. लग्नानंतर संशयितांनी तरुणाला मुलीची बहिण आजारी असून तिला भेटण्यासाठी तुम्हा नवरा बायकोला जायचे आहे, असे सांगून मुलीला लग्नात केलेले सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह बोलावून घेतले. नवदाम्पत्य भुसावळ येथे भेटल्यानंतर संशयितांनी मुलीस त्यांचे नातेवाईकांसोबत पाठवून दिले होते. नवरदेवाने याबाबत जाब विचारला असता त्याला उडवाउडवीची उत्तरे देत मारहाण करण्यात आली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणाने पोलिसात धाव तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एलसीबीच्या पथकाने दोघांना केली अटक

लग्नाचे फोटो, त्यांचे संपर्क क्रमांक आणि इतर माहितीच्या आधारे एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने संशयितांचा शोध घेतला. पथकातील अधिनस्त पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, पोलीस नाईक विनोद पाटील, रणजित जाधव, किशोर राठोड, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील यांनी गुप्त माहिती काढून गोकुळ रविंद्र सोनवणे (वय-३०) याला विदगाव येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी सापळा रचत त्यालाच फोन करून सोनाली गोकूळ सोनार (वय-२८ ह.मु. कांचननगर, जळगाव) हिस टॉवर चौक परिसरात बोलाविण्यास सांगितले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत भडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

अशी होती फसवणुकीची पद्धत

संसाराची पवित्र विवाह बंधनात अडकण्याची मुलगी भेटत नाही, मुलाचे वय वाढत आहे असे एखादे कुटुंब शोधायचे आणि त्यांच्यावर फासे टाकायचे. नवरी आणून देण्याच्या बहाण्याने चौकडी अगोदर कमीत कमी २ लाख रुपयेते घेत होते. पाहण्याचा कार्यक्रम आटोपताच मुलीला द्यायचे दागिने ठरले कि लग्नाची तारीख काढली जात होती. लग्न पार पडल्यावर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी नवरी मुलीच्या बहिणीची प्रकृती ढासळल्याचे कारण देत नवरी माहेरी जात असे आणि त्यानंतर ती पुन्हा सासरी परतत नव्हती.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar