बेशुद्धावस्थेत दाखल गर्भवतीला मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२१ । अतिशय गंभीर अवस्थेत दाखल एका ३० वर्षीय गर्भवती महिलेवर अतिशय क्लिष्ट व दुर्मिळ शस्त्रक्रिया करून मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्री रोग विभागातील डॉक्टरांना यश आले. गंभीर बाब म्हणजे या महिलेची प्रकृती पाहून कोणत्याच खासगी रुग्णालयाने दाखल करून घेतले नव्हते. अखेर शासकीय रुग्णालयात ६ रक्ताच्या बाटल्या व ४ प्लाइमाच्या बाटल्या लावून उपचार करून या महिलेचा जीव वाचविण्यात आला.

यावल तालुक्यातील ३० वर्षीय महिलेचे आधी एक सिझेरियन झाले होते. ही गर्भवती महिला दोन दिवसांपूर्वी अतिशय गंभीर अवस्थेत जीएमसीत दाखल झाली होती. ज्युनिअर डॉक्टरांनी धावपळ करून तातडीने ६ बाटल्या रक्त व ४ प्लाइमाच्या बाटल्या या महिलेला दिल्या. विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने या महिलेची तपासणी करून शस्त्रक्रिया केली. यादरम्यान, रुग्णाच्या गर्भाशयातील बाळाची नाळ गर्भ पिशवीच्या मुखाजवळ चिकटून ती रुग्णाच्या आधीच्या सिझेरियनच्या टाक्यातून गर्भपिशवीच्या बाहेर येऊन मूत्राशयाच्या पिशवीला चिकटलेली होती. यामुळे या महिलेला अती रक्तस्राव झालेला होता. गर्भपिशवी काढावी लागली. या क्लिष्ट शस्त्रक्रियेनंतर रुग्ण महिलेला दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

दरम्यान, या महिलेचा पुनर्जन्म झाल्याची प्रतिक्रिया यावेळी नातेवाईकांनी दिली. यात डॉ. शालका पाटील, डॉ. सोनाली मुपडे, भूलतज्ज्ञ डॉ. किरण सोनवणे, डॉ. स्वप्नील इंकणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -