जळगाव शहरातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्यास अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२१ । जळगाव शहरातील गोलाणी मार्केटसह परिसरातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याला शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली असून या चोरट्याकडून चोरीच्या १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

जळगाव शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या गोलाणी मार्केट परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना लक्षात घेऊन दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी गुन्हे पथकातील कर्मचार्‍यांचे पथक तयार केले होते. दरम्यान गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर व पोलीस नाईक भास्कर ठाकरे या दोघांना दुचाकी चोरटा नेहमीप्रमाणे चोरी करण्यासाठी गोलाणी मार्केटमध्ये आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार प्रणेश ठाकूर, भास्कर ठाकरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ, पोलीस कॉन्स्टेबल उमेश भांडारकर, संतोष खवले, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, किशोर निकुंभ, तेजस मराठे, योगेश इंधाटे आदींच्या पथकाने गोलाणी मार्केटमध्ये सापळा रचून संशयित इब्राहीम मुसा तांबोळी (वय-२६, रा. तोंडापूर ता.जामनेर) याला अटक केली.

१० दुचाकी जप्त
संशयित इब्राहीम तांबोळी याने १५ दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून शहर पोलिस ठाण्यात दाखल विविध गुन्ह्यामधील चोरीच्या १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज