जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । औरंगाबाद महामार्गावरील पहूर, वाकोद दरम्यान कारने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना २५ रोजी घडली. शेख अन्सार (वय-४३) असे मृताचे नाव असून याबाबत पहूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत असे की, वाकाेद येथील शेख अन्सार हे पहूर येथून वाकोदकडे दुचाकीने जात हाेते. या वेळी हिवरी फाट्याजवळ पहूरकडून सिल्लोडकडे जाणाऱ्या मारुती बलेनो कार (एमएच- २०, बीव्ही- ५०७७) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. मंगळवारी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान झालेल्या या भीषण अपघातात शेख अन्सार हे गंभीर जखमी झाले. त्यांना पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर प्राथमिक उपचार करण्यात आले.
प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, बलेनो कार चालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता फर्दापूर पोलिस ठाण्यात हजर झाला. या चालकानेच १०८ क्रमांकाला कॉल करून अपघाताची माहिती दिल्याचे समजते. दरम्यान, फर्दापूर पोलिसांनी पहूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून कार व कारचालकाला पहूर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शवविच्छेदनासाठी जामनेर येथील जिल्हा उपरुग्णालयात मृत शेख अन्सार यांचा मृतदेह नेण्यात आला हाेता. अपघातातील दोन्ही वाहने पहूर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.
हे देखील वाचा :
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- Breaking : जळगावात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात
- बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाचा हृदयविकाराने मृत्यू ; यावल तालुक्यातील दुर्दैवी घटना
- धक्कादायक ! जळगाव शहरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबारीची घटना