घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या साठा करून त्यातील गॅस विद्युतपंपाच्या सहाय्याने वाहनात भरून गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दोघांवर बुधवार दि.१० रोजी एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २७ रिकामे व ४ भरलेलया सिलेंडरसह ६८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील मास्टर कॉलनीत घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या साठा करून त्यातील गॅस बेकायदेशीरपणे वाहनात भरून देऊन विक्री केला जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. कुमार चिंथा यांना मिळाली होती. दरम्यान, त्यांनी याबाबतची माहिती जिल्हा पेठ पोलिसांना देत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलीस नाईक सलीम तडवी, रवींद्र मोतीराया, महेश महाले, पोलीस कॉन्स्टेबल समाधान पाटील, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक मिलिंद सोनवणे, गणेश शिरसाळे आदींच्या पथकाने बुधवार दि.१० रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मास्टर कॉलनीतील जळगाव किराणाच्या मागील बाजूस असलेल्या पत्राच्या शेडवर धाड टाकून कारवाई केली. या ठिकाणी सिराजखान रज्जाक खान उर्फ शेरा खान (वय-३०, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) व जहांगीर रफिक पटेल (वय-४४, रा. सदाशिवनगर शेरा चौक, जळगाव) हे पंपाच्या सहाय्याने एका सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरतांना आढळून आले. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

३१ सिलेंडर जप्त
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सिलेंडरमधील गॅस खाजगी वाहनांमध्ये भरून देत असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून भारतगॅस कंपनीचे ४ भरलेले व २४ रिकामे, इण्डेन कंपनीचा १ व एच.पी. कंपनीचा १ रिकामा सिलेंडर, १ इलेक्ट्रानिक वजन काटा, गॅस भरण्याचे मशीन व १ हजार ९२० रुपये रोख असा ६८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज