शहरातील वाहतूक कोंडीला अतिक्रमण, चारचाकी कारणीभूत

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२१ । शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गोलाणी मार्केट, फुले मार्केट, घाणेकर चौक, गांधी मार्केट, सुभाष चौक, दाणाबाजारात होणाऱ्या वाहतूक कोंडीला बेशिस्त वाहनधारक, अतिक्रमण आणि चारचाकीच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडी होत आहे.

कोणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जारी केलेल्या निर्बंधामध्ये शिथिलता आणण्यात आली असून रात्री ८ वाजेनंतर दुकाने बंद होणार आहे. सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान आणि दुपारी ५ ते ७ वाजेच्या दरम्यान बाजारपेठेत येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठी गर्दी होत असते. मुख्य बाजारपेठेचा परिसर असलेल्या कोर्ट चौक, गोलाणी मार्केट, चित्रा चौक, सुभाष चौक, गांधी मार्केट, दाणा बाजार, घाणेकर चौक परिसरात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना बराच वेळ त्यात अडकून रहावे लागते.

शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी दिवसभर वाहतूक सुरळीत करण्यासाठी या चौकांमध्ये थांबून प्रयत्न करीत असतात तरीही वाहतूक ठप्प होतच असते. शहरातील बहुतांश व्यापारी संकुलात पार्किंगच्या जागी हॉकर्सने आपले बस्तान मांडले आहे तर बऱ्याच ठिकाणी दुकानदारांनी दुकानाबाहेर अतिरिक्त ओटे केल्याने वाहने लावण्यास जागा राहत नाही. वाहनांची संख्या वाढल्याने आणि मुख्य बाजारपेठ परिसरात पार्किंग व्यवस्था वाहने रस्त्यावर लावली जातात. परिणामी मुख्य रहदारीच रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला अडचण निर्माण होते.

शहरात वाहतूक शाखेकडून काही एकेरी मार्ग निश्चित करण्यात आले आहे. तरीही त्या मार्गावर नियमांचे पालन होत नाही. घाणेकर चौकात चारचाकी वळण घेत असताना आणि गोलानी मार्केट परिसरात अतिक्रमित वाहनधारकांमुळे नागरिकांना वाहने चालविण्यास अडथळा निर्माण होतो. महात्मा फुले मार्केटसमोर मनपाने पेड पार्किंग सुरू केली असली तरी बहुतांश दुचाकी चालक त्याठिकाणी आपली वाहने लावत नाही. वाहने रस्त्यावर लावल्याने वाहतूक ठप्प होत असते.

शहरातील पार्किंगचा गंभीर प्रश्न लक्षात घेता सकाळी १० ते १२ आणि दुपारी ४ ते ७ चारचाकी आणि अवजड वाहनांना मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने तसा निर्णय घेतल्यास वाहतुकीचा गंभीर प्रश्न मार्गी लागू शकतो.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -