चोपड्याकडे जाणाऱ्या बसवर ममुराबादजवळ दगडफेक

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । जळगाव आगारातून चोपडा मार्गावर सोडण्यात आलेल्या एका बसवर ममुराबादजवळील रेणुका माता मंदिराजवळ दगडफेक करण्यात आल्याची घटना आज (दि.२१) दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. यात बसची काच फुटून नुकसान झाले आहे.

एस.टी.चे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे गेल्या १५ दिवसांपासून बससेवा ठप्प झाली आहे. प्रवाशांचे हाल होत असल्याने प्रतीक्षा यादीतील चालक व वाहकांना कामावर बोलावून काही मार्गावर बससेवा सुरु करण्याचा निर्णय एस.टी. प्रशासनाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार प्रतीक्षा यादीतील ३८ चालक व वाहकांना कामावर बोलावून आज (दि.२१) पासून जळगाव आगारातून काही बसेस सोडण्यात आल्या.

यापैकी चोपडा मार्गावर सोडण्यात आलेली बस (क्र. एम.एच.२०, बी.एल.३३६१) वर ममुराबादजवळील रेणुकामाता मंदिराजवळ दुपारी ४ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. यात बसची काच फुटल्याने नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच जळगाव आगाराचे विभाग नियंत्रक भगवान जोगणार आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत पाहणी केली. दरम्यान, बसवर दगडफेक करणाऱ्या या अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज