fbpx

जळगावच्या ‘त्या’ तीन नगरसेवकांनी घेतली आ.गिरीश महाजनांची भेट

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । शहर मनपातील भारतीय जनता पक्षाच्या तीन नगरसेवकांनी शनिवारी माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांची भेट घेतली. भाजपातून बाहेर पडलेल्या बंडखोर नगरसेवकांसोबत या तीन नगरसेवकांची देखील नावे जोडली जात होती. आम्ही भाजप सोबतच आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी ही भेट घेतल्याचे समजते.

जळगाव शहर मनपातील भाजपच्या काही नगरसेवकांनी बंडखोरी करीत महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेला मदत केली होती. भाजपचे २७ नगरसेवक बंडखोरी करून बाहेर पडल्यानंतर आणखी तीन नगरसेवकांची नावे शिवसेनेसोबत जोडली जात होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे फोटो देखील झळकले होते. भाजपने बंडखोरी करणाऱ्या २७ नगरसेवकांना अपात्रतेच्या कारवाईसाठी नोटीस दिली होती. त्यात पिंप्राळ्यातील नगरसेवक सुरेश सोनवणे, महिला व बालकल्याण सभापती शोभा बारी व हसीनाबी शेख यांना नोटीस बजावण्यात आली नव्हती.

तिन्ही नगरसेवक भाजपसोबत आहेत की नाही हे स्पष्ट होत नसल्याने त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी यासाठी इतर नगरसेवकांकडून माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्याकडे वारंवार तक्रार केली जात होती. तिन्ही नगरसेवक आ.महाजन यांच्या संपर्कात असले तरी ते समोर येत नसल्याने अधिक गोंधळ वाढला होता. अखेर शनिवारी आ.गिरीश महाजन हे जळगावात आले असता तिन्ही नगरसेवकांनी अजिंठा विश्रामगृहात त्यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे इतर नगरसेवक देखील उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज