एरंडोल येथे आढळले तीन कोरोना रुग्ण; सरकारी यंत्रणा सतर्क

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । एरंडोल येथे १६ ऑक्टोबर रोजी एकाच परिवारातील तीन जण कोरोना बाधित आढळुन आले होते. त्यानंतर सरकारी यंत्रणा सतर्क झाली असून या ठिकाणी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार सुचिता चव्हाण, मुख्याधिकारी विकास नवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाऊन लागलीच कारवाई केली.

एरंडोल येथील प्रणव नगरातील कोरोना बाधित आढळून आलेल्या कुटुंबाच्या घरी भेट देऊन व नगरपालिकेला पत्र देऊन त्याठिकाणी निर्जंतुकीकरण करणे व तहसिलदार यांना पत्र देऊन घराजवळील परिसर काँटन्मेंट झोन तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या परिवारातील एक मुलगा ज्या शाळेत परीक्षा देण्यासाठी गेला होता त्या शाळेचे दोन वर्ग शाळेकडून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहेत. २९ विद्यार्थी, एक शिक्षिका व त्या कुटुंबाच्या संपर्कातील डॉक्टर व अन्य अशा एकुण ३७ लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या व त्या सर्व निगेटिव्ह आल्या असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख यांनी सांगितले. त्याच बरोबर मुंबई येथुन परतलेला त्या कुटुंबातील मुलाच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती मिळवत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख यांनी सांगितले. ऐन दिवाळीच्या आधी शहरात रुग्ण सापडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

१७८ नागरिकांचे समुपदेशन
लोक अजुनही लसीकरण करुन घेत नसल्याने स्वतः तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी कासोदा येथे १७८ लोकांचे समुपदेशन करून लसीकरण केले. सोनबर्डी येथे देखील स्वतः डॉ.शेख यांनी त्या ठिकाणच्या रहिवाशांना समुपदेशन करुन ८७ रहिवासी पैकी ६९ नागरिकांचे लसीकरण केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज