fbpx

शेतकरी व जीनिंग व्यावसायिकांमध्ये समन्वय असावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

mi-advt

धरणगाव तालुका हा कापसाचे आगार असून येथे जीनींग व्यवसाय मोठ्या प्रमाणात बहरला आहे. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि समाजाचा कणा आहे. धरणगाव तालुक्याचा विचार केला असता कपाशीचे मोठे उत्पादन होत असून येथे जीनींग व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतकर्‍यांनी उत्पादीत केलेल्या मालाला यामुळे तालुक्यातच चांगला भाव मिळत असल्याची बाब समाधानकारक आहेत. कापूस उत्पादकांच्या हितासाठी शेतकरी आणि जीनींग व्यावसायिकांमध्ये समन्वय असल्यास यातून प्रगतीची मोठी संधी असल्याचे प्रतिपादन आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. येथील बिजासनी जिनींग व प्रेसींग फॅक्टरी व जीएस कॉटन कंपनीत विविध विकासकामांच्या उदघाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते.

याबाबत वृत्त असे की, बिजासनी जिनींग प्रेसींग फॅक्टरी आणि जीएस कॉटन कंपनीत आज विविध कामांचे उदघाटन आज करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डी.जी. पाटील, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डी.आर. पाटील; पी.आर. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बी.एन. चौधरी, माजी नगराध्यक्ष अजय पगारिया, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन, पी.आर. विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीवकुमार सोनवणे, मध्यप्रदेशातील खेतीया येथील उद्योजक साहेबराव चौधरी, चाळीसगाव येथील शासकीय कंत्राटदार दिलीप चौधरी यांची उपस्थिती होती.
यात जीनिंगमधील कापूस शेडचे उदघाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर गठाण शेडचे उदघाटन शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ , कामगारांच्या क्वार्टरचे उदघाटन कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डी.जी. पाटील ; सरकी शेडचे उदघाटन विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डी.आर. पाटील यांच्या हस्ते तर बिजासनी सरकी शेडचे उदघाटन पी.आर. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बी.एन. चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी सुरेश चौधरी यांनी स्वकर्तुत्वाने व संघर्षातून शेतकरी हित केंद्रबिंदू मानून उभा केलेल्या जिनिग व्यवसाय बाबत कौतुक केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिनिंगचे मालक तथा माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी यांनी जिनिग बाबत सविस्तर माहिती विषद केली. तर सूत्रसंचालन व आभार किरण अग्निहोत्री यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगराध्यक्ष निलेश चौधरी, बीजासनी जिनिंगचे संचालक संजय चौधरी, उमेश चौधरी तसेच जीएस ट्रेडींग कंपनीचे सुरेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज