fbpx

यावल शहरातील विकसित भागांचा पाणीप्रश्न अखेर मार्गी

जळगाव लाईव्ह न्यूज । सुरेश पाटील । गेल्या २० ते २५ वर्षापासून नागरपालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या प्रतिक्षेत असलेल्या यावल शहरातील विकसित भागांचा पाणीप्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेकरिता जलशुद्धीकरण केंद्र व साठवण तलावाजवळ उच्च कार्यक्षमतेचे ट्रांसफार्मर बसविण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

यावल शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेकरिता जलशुद्धीकरण केंद्र व साठवण तलाव येथे उच्च कार्यक्षमतेचे ट्रांसफार्मर बसविणेसाठी जिल्हाधिकारी यांनी २६ लाख ९६ हजार १९५ रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. गेल्या २० ते २५ वर्षापासून यावल शहरातील विकसित भागात पाणी पुरवठ्यासाठी पाईप लाईन आणि पाण्याची टाकी नसल्यामुळे यावल नगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी १० लाख लिटर क्षमतेच्या नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकामासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करून ७४ लाख रुपयांचा निधी प्राप्त करून ३ वर्षापूर्वीच पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते. गेल्यावर्षी संपूर्ण विकसित भागात नवीन पाईप लाईन टाकून त्यावर नळ कनेक्शन जोडणीचे काम नगरपालिकेतर्फे युद्धपातळीवर करण्यात आले. परंतु साठवण तलावाजवळ आणि जलशुद्धीकरण केंद्राजवळ उच्च दाब कार्यक्षमतेचे ट्रांसफार्मर नसल्यामुळे विकसित भागात पाणीपुरवठा होत नव्हता, परंतु आता लवकरच उच्चदाब कार्यक्षमतेचे ट्रांसफार्मर बसविले जाणार असल्याने यावल शहरातील विकसित भागात व यावल शहरात मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा लवकरच सुरु होणार आहे. नागरिकांची पाण्याची समस्या सुटणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज