चंद्र दर्शनानंतर लाभणार व्रत ‘करावा चौथ’ …जाणून घेऊ या व्रताबद्दल

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । सौभाग्यवती महिला प्रामुख्याने साजरा करत असणारा सण म्हणजे करवा चौथ. मुख्य म्हणजे हा सण म्हणजे एक व्रत आहे. चांगला जोडीदार मिळावा यासाठीही काही ठिकाणी कुमारिका हे व्रत करतात. भारतातील वर्षभरात येणाऱ्या व्रतांपैकी करवा चौथ व्रत हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यात करवा चौथ अधिक साजरे केले जाते. या व्रताबद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

सुवासिनी आनंदाने साजरा करणाऱ्या ‘करवा चौथ’चा अर्थ?

करवा म्हणजे मातीचा घट आणि चौथ म्हणजे चतुर्थी. करवा चौथ व्रत करताना सुवासिनी सर्व प्रकारचे सौभाग्यलंकार परिधान करतात. यादिवशी नवीन करवा आणून तो सजवला जातो. यानंतर पूजा करून याच करवातून चंद्राला अर्घ्य दिले जाते.

करवा चौथ व्रतपूजन विधी

अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला करवा चौथ व्रत केले जाते. सन २०२१ मध्ये २४ ऑक्टोबर २०२१ रोजी करवा चौथ व्रत केले जात आहे. या दिवशी पहाटे लवकर उठून महिला व्रताचा संकल्प करतात. संपूर्ण दिवसभर निर्जला व्रत करून रात्री चंद्रदर्शन घेऊन त्याला अर्घ्य देतात आणि त्यानंतरच यजमानांच्या (पती) हातून पाणी पिऊन व्रताची सांगता केली जाते. या व्रताचरणात सकाळी महादेव शिवशंकर, पार्वती देवी, गणपती आणि कार्तिकेय यांचे पूजन केले जाते. तर सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यावर चंद्रदेवतेचे पूजन करून त्यांना अर्घ्य दिले जाते. याच दिवशी संकष्ट चतुर्थी असल्याने या व्रतातील गणपती पूजनाला वेगळे महत्त्व प्राप्त होते, असे मानले जात आहे.

अशी आहे परंपरा, आख्यायिका

पौराणिक कथेनुसार, सावित्रीने सर्वप्रथम करवा चौथ व्रत केले होते, अशी मान्यता आहे. सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी यमराजांसोबत भांडण केले आणि आपल्या पतीचे प्राण परत आणले. करवा चौथ व्रत करून सुवासिनी सावित्रीला अर्पण करतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. महाभारत काळातही द्रौपदीने अर्जुनाचे प्राण वाचवण्यासाठी श्रीकृष्णाकडे मदत मागितली होती. तेव्हा श्रीकृष्णाने द्रौपदीला दिवसभर उपवास करून महादेव, पार्वती देवी यांचे पूजन करण्यास सांगितले होते. द्रौपदीने मनोभावे केलेल्या व्रताचरणामुळे अर्जुन सुरक्षित राहिला. तेव्हापासून हे व्रत करण्याची परंपरा सुरू झाली, अशी एक कथा करवा चौथ व्रताची सांगितली जाते.

उत्तरेकडील राज्यात असतो उत्साह

सुवासिनी महिला या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. या व्रतात महादेव शिवशंकर, पार्वती देवी, गणपती आणि कार्तिकेय यांसह चंद्राचे पूजन करण्याची प्रथा प्रचलित आहे. करवा चौथ मुख्यत्वे करून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाते. राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे व्रत अगदी पारंपरिक पद्धतीने केले जाते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज