कन्नड घाटातील वाहतूक कोंडी सुटेना; भावी पोलिसांना जॅमचा फटका

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । पाच दिवस उलटल्यानंतरही कन्नड घाटमधील वाहतूक कोंडी सुटत नसल्याने वाहनधारकांसह पोलीस प्रशासनाला चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. रविवार दि.१४ रोजी झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका भावी पोलीस उमेदवारांना बसला. औरंगाबाद येथे पोलीस भरतीसाठी जाणारे उमेदवार या ट्राफिक जॅममध्ये अडकले होते. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत या घाटातून अवजड वाहतुक बंद करण्यात यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली होती. मात्र लोकप्रतिनिधींकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

कन्नड घाटात दरड कोसळल्यानंतर हा घाट दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर हा घाट सुरुवातीला हलक्या व त्यानंतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र अद्यापही घाटात संरक्षण भिंत उभारणी यासह रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. यामुळे गेल्या ५ दिवसांपासून या घाटात वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. वाळू अन् उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे सर्वाधिक त्रास होत असल्याचे वाहनधारकांकडून सांगण्यात येत आहे. घाट अरुंद त्यातच काही अवजड वाहने ओव्हरटेक करीत असल्याने वाहतुकीची कोंडीत वाढ होत आहे. घाटातील म्हसोबाच्या मंदिर जवळ वाहने तास् न तास अडकून पडत आहेत. औरंगाबाद येथे पोलीस भरतीसाठी जाणारे अनेक उमेदवार रविवार दि.१४ रोजी घाटात झालेल्या जॅममध्ये अडकले होते. वेळेत वाहतूक सुरळीत न झाल्यास आमच्या भविष्याचे नुकसान तर होणार नाही ना, अशी भीती या उमेदवारांकडून व्यक्त केली जात होती.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
कामे सुरु असल्याने घाटात चार ठिकाणी एकेरी वाहतूक केली जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी घाटातील काम पूर्ण होईपर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह काही सामाजिक संघटनांकडून लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली होती. मात्र लोकप्रतिनिधींकडून या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आहे. प्रशासनही घाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. घाटातील काम पूर्ण होईपर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात यावी, अशी मागणीही होत आहे.

पहा व्हिडीओ

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज