कपाटाची चावी शोधून चोरट्यांनी लांबविले दागिने

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । दिवाळीनिमित्त कुटुंबीय बाहेरगावी गेले असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचा कोयंडा तोडला त्यांनतर किचनमधील डब्यांमधून कपाटाची चाबी शोधत ७० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना शहरातील श्रीराम समर्थ कॉलनीत ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेवानिवृत्त सैनिक मनोज रमेश पाटील (वय-४०) हे त्यांच्या कुटुंबियांसह जळगाव शहरातील श्रीराम समर्थ कॉलनीत वास्तव्यास आहेत. दरम्यान, दिवाळीनिमित्त मनोज पाटील हे कुटुंबियांसह ४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मूळगावी जवखेडा येथे येथे गेले होते. ते एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीस असल्याने ते ६ नोव्हेंबर रोजी जवखेडा येथून श्रीराम समर्थ कॉलनीतील घरी आले. त्याच दिवशी सायंकाळी चार वाजता घर बंद करुन ते एमआयडीसीतील कंपनीत ड्युटीवर निघून गेले. त्यानंतर रात्री ते परस्पर जवखेडा येथे निघून गेले होते. दि.८ रोजी सकाळी ते पुन्हा घरी आले. यावेळी त्यांना त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडल्याचे दिसून आले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

चोरट्यांनी कपांऊंडवरुन उडी मारुन अंगणात प्रवेश करून त्यानंतर कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर या घरातील खालच्या मजल्यावरील किचनमध्ये एका डब्यात ठेवलेली कपाटाची चावी शोधून या चावीच्या सहाय्याने वरच्या मजल्यावरील कपाट उघडून त्यातून ६९ हजार ६०० रुपयांचे दागिने लांबवले. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी चावी कपाटालाच राहू दिली. घटनेनंतर पाटील यांनी शोधाशोध केली; परंतु काही मागमूस लागला नाही. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सतीश डोलारे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज