fbpx

घटस्थापनेला मुलीचा जन्म, मातेने घेतला जगाचा निरोप

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । घटस्थापनेच्या मुहूर्तावर मुलगी झाली. आई व मुलीची तब्येत देखील उत्तम होती. घरात लक्ष्मी आल्याने आनंदाचे वातावरण होते. अचानक दुसऱ्याच दिवशीमातेच्या फुप्फुसात रक्ताची गाठ झाल्याने मातेचा मृत्यू झाला. अवघ्या २८ तासांतच तान्हुलीच्या डोक्यावरून मातृछत्र हरपले. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हा प्रकार घडला. रुग्णालयात जमलेल्या नातेवाइकांचा आक्रोश पाहून अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.

सोयगाव तालुक्यातील निंबायती येथील अश्विनी राहुल राठोड (वय २०) या महिलेची प्रसूतीची वेळ जवळ आल्याने त्यांना बुधवारी दुपारी साडेतीन वाजता जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी व उपचार केल्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी गुरुवारी सकाळी ११ वाजता सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली. अश्विनी यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. घटस्थापनेला घरात लक्ष्मी आल्याने तसेच आई आणि बाळाची तब्येत उत्तम असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. डॉक्टरांकडून तपासणी करून उपचार सुरू होते; मात्र अचानक शुक्रवारी अश्विनीला त्रास सुरू झाला. तपासणी केल्यानंतर फुप्फुसात रक्ताची गाठ झाल्याचे निदर्शनास आले. उपचार सुरू असतानाच दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी या मातेचा मृत्यू झाला.

mi advt

चिमुकलीचे हरपले छत्र, जावेने पाजले दूध
संसाराची सुरुवात झाल्यानंतर आता आई होण्याचे सुख भोगण्याची स्वप्ने बघत असतानाच अवघ्या २०व्या वर्षी मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी आक्रोश केला होता. जन्मानंतर अवघ्या २८ तासांतच तान्हुलीच्या डोक्यावरून मातृछत्र हरपल्याने आता तिचा सांभाळ कोण करणार? असा प्रश्न उपस्थित झाला असतानाच अश्विनीच्या जावेने मुलीला सांभाळत दूध पाजले. या वेळी अनेकांचे डोळे पाणावले होते. सुखी संसारात आनंदाचे क्षण येत असताना अचानक काळाचा घाला आल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. चिमुकलीकडे पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

प्रसूतीनंतर तयार होऊ शकते शरीरात गाठ
प्रसूतीनंतर शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात; मात्र फुप्फुसात गाठ तयार होण्याचे प्रमाण अत्यंत अल्प असते. ही गाठ अचानक तयार होत असल्याने त्यावर इलाज करणे कठीण होत असल्याने महिलेचा मृत्यू होताे असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ.संजय बनसोडे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज