मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार; एसटी कर्मचाऱ्यांचा निर्धार

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण पुकारण्यात आले असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू राहणार असून मागे हटणार नसल्याचा निर्धार संयुक्त कृती समितीकडून गुरुवार दि.२८ रोजी करण्यात आला. गुरुवारी एरंडोल डेपोमधून एकही बस बाहेर न पडल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.

राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी संपूर्ण राज्यात एसटीच्या सर्व संघटनांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गुरुवार दि.२८ रोजी जळगाव जिल्ह्यासह एरंडोल डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागला. पहाटे पाच वाजेपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली. यात वाहक, चालक, तंत्रज्ञ यांसह सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. एरंडोल आगाराच्या गेटबाहेर सुरु असलेल्या या उपोषणास शिवसेनेचे रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक डॉ. सुरेश पाटील, रविंद्र पाटील, राजेंद्र शिंदे, विश्वास पाटील, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव अहिरराव यांनी पाठींबा दिला. यावेळी शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉ.सतीश पाटील यांना निवेदन देवून शासनाकडे पाठविण्यात येणार असून उपोषणास जाहीर पाठींबा देत असल्याचे सांगण्यात आले. कर्मचारी वर्गाच्या मागण्या रास्त असून शासनाने त्वरीत दखल घेण्याची विनंती करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

शासनाने आतातरी जागे व्हावे
उपोषणादरम्यान, मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू राहणार असून मागे हटणार नसल्याचे संयुक्त कृती समितीकडून जाहीर करण्यात आले. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय होणार असून महामंडळ प्रशासन व शासनाने दखल घ्यावी, असे आवाहन कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले. वाहक किशोर मोराणकर यांनी मागण्यांबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी शासन कर्मचारी म्हणून मान्यता यावी, दिवाळी भेट, घरभाडे भत्ता, वेतनवाढ मिळावी आदी मागण्या असल्याचे सांगितले. कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून काम केले परंतु आतापर्यंत पगार न झाल्यामुळे २९ कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्याचेही सांगण्यात आले. ऐन दिवाळीत उपोषण करण्यास भाग पडले आहे. प्रवासी, नागरिकांनी दखल घ्यावी असे आवाहन करण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज