विद्युत पोल शिफ्टिंग करताना पोलसह कोसळला कर्मचारी, दोघे थोडक्यात बचावले

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या पोल शिफ्टिंगचे काम सुरू आहे. गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास जुन्या खांबाच्या तार कापताच कर्मचारी खांबासह खाली कोसळला. दैव बलवत्तर असल्याने त्या कर्मचाऱ्यासह खाली उभा असलेला दुचाकी वाहन चालक दोघे थोडक्यात बचावले आहेत.

शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. दोन दिवसापूर्वीच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कामाची पाहणी केली होती. विद्युत पोल शिफ्टिंगचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले असून जुने पोल हटविण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी सकाळी श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारजवळ असलेला एक जुना विद्युत खांब हटवण्यासाठी मुन्ना गवळी वय-२४ रा.त्रंबकेश्वर जि. नाशिक हा कर्मचारी खांबावर चढलेला होता.

खांबाला हुक अडकविल्यानंतर मुन्ना गवळी या कर्मचाऱ्याने एका बाजूचे जुने तार कापले. जिल्हा परिषदकडील खांबाला जोडलेले असलेले विद्युत तार कापताच तो तरुण खांबासह खाली रस्त्यावर कोसळला. रस्त्यावर आपल्या दुचाकीसह उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या शेजारीच खांब पडल्याने तो बालंबाल बचावला आहे. सुदैवाने मुन्ना गवळी या कर्मचाऱ्याला देखील फारशी दुखापत झाली नाही.

दोन्ही जखमींना तात्काळ रुग्णालयात घेऊन जात उपचार करण्यात आले. जुना खांब खालील बाजूने सडलेला असल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी देखील पुलाच्या खड्ड्यात दोन वेळा चारचाकी वाहन फसले होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज