थंडी पुन्हा ओसरली, जिल्ह्यात अवकाळीची शक्यता

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ ।  तीन दिवसांपूर्वी शहराचा पारा १० अंशांवर पोहोचला होता. मात्र, अवघ्या तीन दिवसातच शहराच्या तापमानात तब्बल १० अंशांची वाढ झाली असून, शुक्रवारी १० अंशांवर पोहोचलेले तापमान सोमवारी २० अंशांवर पोहोचले होते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी गुलाबी थंडीने हुडहुडी भरलेल्या जळगावकरांना सोमवारी मात्र पुन्हा बंद केलेले पंखे सुरू करावे लागले. तापमान वाढल्याने काही प्रमाणात उकाडादेखील जाणवू लागला आहे. त्यातच आगामी दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाजदेखील भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात शहराच्या तापमानात चांगलीच घट होऊन, थंडीचा कडाका वाढला होता. मात्र पुन्हा बंगालच्या सागरावर निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे मध्य महाराष्ट्र ते थेट तामिळनाडूपर्यंत एक ट्रफ रेषा निर्माण झाली असून, यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे अडविले जात आहेत. यामुळे तापमानात वाढ होऊन, पुढील १६ ते १९ दरम्यान जिल्ह्यातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता ही ३० ते ३५ टक्के इतकी आहे. मात्र, जिल्ह्यात आगामी तीन दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याने किमान तापमान १८ ते २१ अंशादरम्यान कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवडाभर थंडी गायबच राहणार आहे.

गेल्या पाच दिवसांतील किमान तापमानाची स्थिती

गुरुवार ११ अंश, शुक्रवार १० अंश, शनिवार १२ अंश, रविवार १६ अंश, सोमवार २० अंश

 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज