शिक्षकांचे पगार ऑफलाईन पद्धतीने व्हावे; आ.डॉ. सुधीर तांबे यांची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । अनुदान मिळून ६ महिने उलटल्यानंतरही अद्यापपर्यंत शालार्थ आयडी न मिळाल्याने गेल्या ४ महिन्यांपासून २० % अंशतः अनुदानावर काम करणाऱ्या महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांवर उपसमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अंशतः अनुदानित शिक्षकांचे पगार ऑफलाईन पद्धतीने करण्यात यावे, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार वेळेत मिळावे, म्हणून शासनाने २० टक्के अंशतः अनुदानित तत्त्वावरील उच्च माध्यमिक शिक्षकांना शालार्थ आयडी देण्यासाठी एप्रिल २०२१ मध्ये पत्र निर्गमित केले होते. सहा महिन्याचा कालावधी लोटला गेला मात्र, अद्यापपर्यंत राज्यभरामध्ये शालार्थ आयडी बाबतचे कामकाज समाधानकारकरीत्या पूर्ण झालेले नाही. आता शासनाने ऑफलाइन वेतन करण्याचा आदेश काढला नाही तसेच या शिक्षकांच्या नोंदी शालार्थ प्रणालीत समाविष्ट झाल्या नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे पगार बिले वेतन पथकाने न स्वीकारल्याने त्यांची दिवाळी पगाराविना अंधारात जाणार आहे. आधीच वीस वर्षे पगार मिळाला नाही. आता पगार सुरू होऊनही हातात पगार नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. तातडीने पगार बिले वेतन पथकाने स्वीकारण्यासाठी शासनाने ऑफलाइन वेतनाचे आदेश काढून दिवाळी अगोदर शिक्षकांची पगार करावे, अशी मागणी शिक्षक कर्मचाऱ्यातून होत होती.

शालार्थ प्रक्रिया अतीजलद पद्धतीने करून लवकरात लवकर ऑनलाइन वेतन सुरू करावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत होती. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी आयुक्तांकडे अंशतः अनुदानित शिक्षकांचे पगार ऑफलाईन पद्धतीने करावे, अशी मागणी केली आहे. यावेळी प्रा.दिनेश पाटील, प्रा.अनिल परदेशी, जेष्ठ शिक्षक सुनिल गरुड, प्रा.शैलेश राणे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज