शालार्थ आयडी न मिळाल्याने शिक्षकांची ‘दिवाळी अंधारात’

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२१ । दिवाळीचा सण देशभरात धुमधडाक्यात साजरा करण्यात येत असतो. मात्र २०% अंशतः अनुदानावर काम करणाऱ्या शिक्षकांवर गेल्या ४ महिन्यांपासून पगार नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त शिक्षकांना शालार्थ आयडी न मिळाल्याने या दिवाळीला पगार मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षकांची ‘दिवाळी अंधारात’ जाणार आहे.

ऑनलाईन वेतनसाठी शालार्थ आयडीचा प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षणमंत्री, आयुक्त यांनी अनेकदा शिक्षक आमदार व पदवीधर आमदार याना आश्वासन दिले. मात्र, आयुक्तांच्या पत्राला केराची टोपली दाखवण्याचे काम त्यांच्याच अखत्यारीतील कार्यालयाने केलेला असल्याने शिक्षक वर्गामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. शॉलार्थ आयडीच्या फाईल मागील ६ महिन्यापासून १००% निकाली निघालेल्या नाही. आज ना उद्या, मेहनतीचा पगार आपल्याला मिळेल, ही अपेक्षा या शिक्षकांना आहे. एकीकडे महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांचे जीवन पूर्वपदावर येण्यासाठी शाळा सुरू करत आहे, मात्र गेल्या वीस वर्षापासून विनावेतन जगणाऱ्या शिक्षकांचे पगार सुरू होऊ नये, प्रशासकीय उदासीनतेमुळे वेतनापासून वंचित असलेल्या शिक्षकांच्या पगारा बाबत कोणतीही ठोस पावले उचलत नसल्यामुळे यंदाची ही दिवाळी शिक्षकांच्या अंधारात जाणार असे चित्र निर्माण झाले आहे.

शासनाने ऑलाइनवेतन करण्याचा आदेश काढला नाही तसेच या शिक्षकांच्या नोंदी शालार्थ प्रणालीत समाविष्ट झाल्या नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे पगार बिले वेतन पथकाने न स्वीकारल्याने त्यांची दिवाळी पगारा विना अंधारात जाणार आहे. आधीच वीस वर्षे पगार मिळाला नाही. आता पगार सुरू होऊनही हातात पगार नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. तातडीने पगार बिले वेतन पथकाने स्वीकारण्यासाठी शासनाने ऑफलाइन वेतनाचे आदेश काढून दिवाळी अगोदर शिक्षकांचे पगार करावे, अशी मागणी होत आहे.

अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
ज्या कार्यालयाकडे शालार्थ आयडी देण्याची जबाबदारी आयुक्तांनी दिली होती. त्या कार्यालयातील अधिकार्‍यांनी सेवा कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी व त्यांची देखील दिवाळी अंधारात जावी त्यांना देखील पगार देण्यात येऊ नये. शिक्षकांचा दसरा, ईद, दिवाळी अंधारात ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई आयुक्तांनी करावी.
– प्रा. राहुल कांबळे, राज्यउपाध्यक्ष

कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती
राज्यातील अंशत: अनुदानित, अनुदानित सुमारे 20 हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नोंदणी शालार्थ प्रणालीत १००% न झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी पगाराविना अंधारात होणार आहे. राज्यातील शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
– प्रा. दिनेश पाटील, नाशिक विभाग अध्यक्ष

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज