‘या’ योजनेचा लाभ घेऊन १३ शेतकरी झाले थकबाकीतून मुक्त

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । महावितरणच्या ‘महा कृषी ऊर्जा अभियाना’त जवळपास ६६ टक्के सूट मिळविण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घेत सावदा येथे १३ शेतकऱ्यांनी गुरुवारी दि.२८ रोजी एकाच दिवशी २४ लाखांचे वीजबिल भरून कृषिपंपांच्या थकबाकीतून मुक्त होण्याचा मान मिळविला. महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक (प्र.) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांनी जळगाव, नशिराबाद, भुसावळ, मुक्ताईनगर,सावदा येथे भेट देऊन वीजबिल थकबाकी वसुलीसह महावितरणच्या कामकाजाचा आढावा घेतला. कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी थकबाकीच्या रकमेत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी महा कृषी ऊर्जा अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. या योजनेत सहभागी होऊन कृषिपंपाचे वीजबिल कोरे करावे तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन करून बिल भरण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत रावेर व यावल तालुक्यातील १३ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी तब्बल २४ लाख रुपयांचे वीजबिल भरले आणि थकबाकीमुक्त होण्याचा मान मिळवला.

यांचा झाला सत्कार
अनिता सुधाकर चौधरी, विलास चौधरी, यादवराव पाटील, लक्ष्मण चौधरी, बाबुलाल गुप्ता, हिरामण बोंडे, गोविंदा इंगळे, गुणवंत नेमाडे, संजय पाटील, कविता राणे, भगवान पाटील, पंडितराव चौधरी व डिगंबर पाटील या सर्व ग्राहकांचा सहव्यवस्थापकीय संचालक (प्र.) श्री.प्रसाद रेशमे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधीक्षक अभियंता फारूक शेख, कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे, उपविभागीय व कक्ष अभियंत्यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

विकास कामांसाठी खर्च : प्रसाद रेशमे
यावेळी बोलताना श्री.रेशमे म्हणाले की, कृषिपंप वीजबिलांच्या वसुलीतून ६६ टक्के कृषी आकस्मिक निधी म्हणजेच प्रत्येकी ३३ टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे. हा निधी त्या-त्या ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रातच स्थानिक वीजयंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे. स्वतंत्र खात्यात जमा होणाऱ्या निधीतून नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र व क्षमतावाढ तसेच नवीन वीजजोडण्या यासह वीज वितरण व उपकेंद्रातील विविध यंत्रणेच्या पायाभूत सक्षमीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक योजनेत सहभागी होऊन कृषिपंपाचे वीजबिल कोरे करावे तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

वसुलीसाठी प्रयत्न करा

कृषिपंप ग्राहकांसह सर्व ग्राहकांना दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा करावा, महावितरणची खालावलेली आर्थिक परिस्थिती पाहता वीजबिलांच्या थकबाकी वसुलीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे विजेच्या प्रत्येक युनिटच्या वसुलीसाठी प्रयत्न करावे, असे निर्देश श्री. रेशमे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज