जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२२ । जालना-जळगाव रेल्वेमार्गाच्या अंतिम सर्व्हेला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी मंजुरी दिली आहे. १७४ किलोमीटर लांबीचा हा मार्ग असणार असून सर्व्हेसाठी साडेचार कोटी मंजूर केले आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेचे अधिकारी २३ – २५ मार्चदरम्यान सर्वेक्षण करतील.
मुंबई येथील मुख्य परिचलन अधिकारी व्ही. नलिनी, मुख्य दळणवळण अधिकारी रविप्रकाश गुजराल व मुकेश लाल या तीन सदस्यांची टीम जालना-जळगाव रेल्वेमार्गाचे अंतिम सर्वेक्षण करणार आहे. यात अधिकारी २३ मार्च रोजी जालना येथील ड्रायपोर्ट, औद्योगिक क्षेत्रातील स्टील व बियाणे कंपन्यांना भेट, जिल्हा उद्योग केंद्र, विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कार्यालय, तहसील कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, आदी ठिकाणी भेट देणार आहेत. २४ मार्च रोजी श्री क्षेत्र राजूर गणपती, तहसील कार्यालय भोकरदन, कृषी उत्पन्न बाजार समिती भोकरदन, बस आगार सिल्लोड, तहसील कार्यालय सिल्लोड, कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड, अजिंठा व २५ मार्च रोजी जळगाव जिल्ह्यात विविध कार्यालये, औद्योगिक वसाहतीला भेट देणार आहेत.
असा होईल फायदा
जालना-जळगाव रेल्वेमार्गामुळे मराठवाड्याच्या विकासासह शेती, व्यापार, दळणवळण, व्होकल फॉर लोकल, लघुउद्योग, पर्यटनाला चालना मिळणार आहे. जालना वरून पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोड मार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, जळगाव असा मार्ग ७० टक्के मार्ग जालना लोकसभा क्षेत्रातून जात आहे. याचा फायदा पुढे सुरत, गुजरात, राजस्थानच्या गाड्यांना आंध्र प्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी छोटा मार्ग म्हणून होणार आहे.