‘त्या’ १२३ रेशन दुकानांची तपासणी करण्याचे पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । तालुक्यातील १२३ रेशन दुकानदारांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत गोदामातून धान्य उचल न करताच रेशन कार्डधारकांचे ई-पॉस मशीनवर थम्ब इंप्रेशन घेऊन त्यांना ऑनलाइन धान्य वाटप केल्याचे दर्शवले होते. या प्रकरणात सर्व रेशन दुकानांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिले आहे.

सविस्तर असे की, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्याची गोदामातून उचल न करता तालुक्यातील १२३ रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीनवर रेशनकार्डधारकांचे थम्ब इंप्रेशन घेतले. त्यांना धान्य वाटप केल्याचे ऑनलाइन दर्शवले. त्याबाबत जळगाव तहसीलदार नामदेव पाटील यांनी २२ नोव्हेंबर रोजी ‘त्या’ रेशन दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. त्याचप्रमाणे लेखी खुलासा मागवला होता. धान्याची उचल न करता ऑनलाइन धान्य वाटप दर्शवून रेशन घोटाळा करण्यात येत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी केला होता. त्याचप्रमाणे त्या १२३ रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केलेली आहे.

त्यानुसार या प्रकरणात नियमानुसार कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्या अनुषंगाने रेशन दुकानांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांनी तहसीलदारांना दिले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -