जळगाव लिव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२। येथील दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे रविवारी दि २४ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात राज्यस्तरीय दीपस्तंभ-२०२२ पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. २०१७ पासून हे पुरस्कार स्व.डॉ.जगन्नाथ वाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिले जातात.सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे व समाजासमोर आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात. ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
२०२१-२२ या वर्षासाठीचे पुरस्कार खालील प्रमाणे आहेत.संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यासाठी योगदान देणाऱ्या जेष्ठ व्यक्तीला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.या वर्षाच्या जीवन गौरव पुरस्काराने विदयार्थी सहाय्यक समितीचे रमाकांत तांबोळी (पुणे) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.समाजामध्ये अतिशय कमी कालावधी मध्ये कामाचा व्यापक परिणाम साधणाऱ्या व्यक्ती व संस्थांना विवेकानंद पुरस्कार दिला जातो.‘पाणी फाऊंडेशन’ आणि विशेष म्हणजे या वर्षी ‘उबुंटु’ चित्रपटातील ‘’माणसाने माणसाशी माणसांसम वागणे’’ या गीताला विवेकानंद पुरस्कार दिला जात आहे.पाच ते सात वर्ष काम करत असलेल्या तरुण व्यक्तींना युवा प्रेरणा पुरस्कार दिला जातो.
सुरवातीच्या काळातच सामाजिक कामाला कौतुक व प्रेरणेची आवश्यकता असते.त्यासाठी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या पूर्ण वेळ सातत्याने काम करत असलेल्या तरुणांना युवा प्रेरणा पुरस्कार दिला जातो.युवा प्रेरणा पुरस्कार खालील प्रमाणे आहे.स्नेहालयचे स्व.विशाल अहिरे (अहमदनगर ) यांना मरणोत्तर युवा प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे.रेडिओ उडानचे दानिश महाजन (पठाणकोट),मिरॅकल फाउंडेशनची मयुरी मदन सुषमा (पुणे ), सकाळ वृत्तपत्राचे संदीप काळे (मुंबई ), मिशन ५०० कोटी जलसाठा ( चाळीसगाव ), बुकलेट अपचे अमृत देशमुख (ठाणे ), योगी फाऊंडेशनचे गिरीश पाटील (चोपडा).
यावेळी जळगाव विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या प्रेराणादायी कार्यक्रमास मोठ्या संख्यने जळगावकरांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन यजुर्वेंद्र महाजन यांनी केले आहे.