नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । जळगाव तालुक्यातील फुपनगरी येथे एका तरुण शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. शरद रामदास वाणी (39) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून  याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, फुफनगरी येथे शरद रामदास वाणी कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांची पत्नी शोभा या दोन्ही मुलींसह माहेरी गेल्या होत्या. बुधवारी ते घरी एकटेच होते. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शरद वाणी यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे शेजारच्यांच्या लक्षात आले. त्यांनी जळगाव शहरात वास्तव्यास असलेले शरद वाणी यांचे मोठे बंधू रवींद्र यांना माहिती कळविली. तसेच शरद यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. येथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषीत केले.

शरद वाणीयांच्याकडे दोन एकर शेती आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळामुळे नुकसान होवून शेतातून फारसे उत्पन्न आले नाही. त्यामुळे विविध कार्यकारी सोसायटी तसेच इतर कर्जाची फेड कशी करायची यामुळे ते नैराश्यात होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती वाणी यांचे भाऊ रवींद्र वाणी यांनी दिली. मयत शरद वाणी यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षाची व एक तीन महिन्याची अशा दोन मुली व भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज