विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२१ । जामनेर तालुक्यातील पहूर येथील संतोषी माता नगरमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. प्रिया राजेंद्र नवघरे (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून  याबाबत पहूर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

शनिवारी प्रिया नवघरे या घरीच नित्याची कामे करत होत्या. तर पती राजेंद्र नवघरे व प्रिया यांची नणंद घरीच होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास घराच्या वरील मजल्यावरील खाेलीत नणंद व राजेंद्र नवघरे हे गेले असता प्रिया नवघरे या छताला गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आल्या. त्यामुळे त्यांना धक्का बसला. दरम्यान, प्रिया नवघरे यांना खाली उतरवत असताना त्या जीवंत होत्या. त्यानंतर त्यांना तातडीने पहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉ. रवींद्र सुरळकर यांनी तपासणी करुन प्रिया यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

याबाबत डॉ. सुरळकर यांच्या माहितीवरून पहूर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली अाहे. या घटनेचा तपास पहूर पोलिस करत आहेत. दरम्यान, प्रिया नवघरे यांचे शवविच्छेदन करुन मृतदेह त्यांच्या माहेरच्या नातेवाइकांनी पाचोरा येथे नेण्याचा आग्रह धरला. परंतु, या वेळी उपसरपंच शाम सावळे व शेंदुर्णी जिनिंगचे संचालक अरुण घोलप यांनी प्रियाच्या नातेवाइकांची समजूत काढली. त्यानंतर त्यांच्यावर पहूर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रिया यांच्या पश्चात ३ मुले, पती, सासू-सासरे, दीर असा परिवार अाहे. प्रिया यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नव्हते.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -