एसपींची अचानक बैठक : दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांवर कारवाई

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । डिसेंबर २०२१ । ड्युटीवर सातत्याने गैरहजर व अचानक दांडी मारणाऱ्या आरसीपीच्या पोलिसांना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सोमवारी दंडाचा डोस देत यापुढे कोणीही असा प्रकार केला तर शिस्तभंग केला म्हणून थेट निलंबित करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आरसीपीत कार्यरत पोलिसांची वर्षभराची कुंडलीही डॉ. मुंढे यांनी काढायला सुरुवात केली आहे.

जिल्ह्यात कुठे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला किंवा ऐनवेळी पोलीस बंदोबस्ताची गरज भासली तर त्यासाठी पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांचे आरसीपीचे आठ प्लाटून तयार करण्यात आले आहेत. पोलीस नियंत्रण कक्ष व मुख्यालय या ठिकाणी कर्मचाऱ्यांना थांबावे लागते. मुक्ताईनगर येथे गेल्या आठवड्यात शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत वाद झाला होता. त्याठिकाणी तातडीने बंदोबस्त पाठविण्याची वेळ आली तेव्हा आरसीपीचे फक्त सहा कर्मचारी उपस्थित होते. त्याआधी देखील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटात तणाव निर्माण झाला होता तेव्हादेखील आरसीपीचे काही कर्मचारी गैरहजर तर कोणी रजेवर होते. काही जणांनी विनापरवानगी दांडी मारली होती. या प्रकारामुळे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सोमवारी अचानकपणे सकाळीच आरसीपीचा आढावा घेत त्यांची बैठक घेतली. कामचुकार व दांडी बहाद्दर पाच जणांवर जागेवरच दंडात्मक कारवाई करण्यात आली. भविष्यात कोणत्याही कर्मचाऱ्याने असा कामचुकारपणा केला तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

एका प्लाटूनमध्ये ३० कर्मचारी

१ ) आरसीपीच्या एका प्लाटूनमध्ये ३० कर्मचारी नियुक्तीला आहेत. असे आठ प्लाटून आपत्कालीनसाठी तयार करण्यात आले आहेत.

२) गैरहजर रजा व ड्युटीवर असताना बाहेर असणे यात स्वरूपानुसार ५ हजार, १० हजार व १५ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. या दंडाची रक्कम त्यांच्या पगारातून कपात होणार आहे.

आणखी काही कर्मचाऱ्यांवर कारवाई

आज पाच जणांवर कारवाई करण्यात आली. आरसीपीत कार्यरत सर्वांचीच वर्षभराची माहिती मागविली आहे. कायदा व सुवस्था सांभाळण्यासाठी तात्काळ बंदोबस्ताची गरज असते. मात्र अशाच वेळी कर्मचारी गायब असल्याचे निदर्शनास आले. आणखी काही कर्मचाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे. असे डॉ. प्रवीण मुंढे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -