जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२४ । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे व्यायाम शाळेत काही तरुणामध्ये झालेल्या बाचाबाचीतून दोन गटात हाणामारी होऊन त्याचे दगडफेकीत रुंपातर झाल्याची घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान पोलीस वाहनांवरही दगडफेक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
शेंदुर्णीतील एका व्यायामशाळेत बुधवारी रात्री युवकांमध्ये बाचाबाची झाली. याचे रूपांतर दोन गटातील हाणामारीत झाले. एकमेकांवर दगड व विटा फेकण्यात आल्या. काही तरुणांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन दुचाकींची तोडफोड केली. पोलिस पथक काही क्षणातच या भागात दाखल झाले. यावेळी पोलिस वाहनावर दगडफेक करण्यात आली. यात एका पोलिसासह दोन्ही गटातील पाच ते सहाजण जखमी झाले आहेत.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक भरत दाते, गणेश सुस्ते आदींनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पाचोरा येथील पोलिस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे हेदेखील घटनास्थळी पोहोचले. खबरदारी म्हणून चाळीसगाव, पाचोरा, पिंपळगाव हरेश्वर, जामनेर, जळगाव येथून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, रात्री ११:३० वाजता पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शेंदुर्णीत घटनास्थळाची पाहणी केली.