कारवाई करा नाही तर, अतिक्रमण विभाग बंद करा; व्यापाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । जळगाव शहरातील नवीन बि.जे. मार्केटच्या मुख्य रस्त्यासह पार्किंगच्या जागेवर मोठ्या अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात अनेकदा पाठपुरावा करूनही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकेचा अतिक्रमण विभाग पूर्णपणे बंद करावा, नाही तर कारवाई तरी करावी, अशा आशयाचे निवेदन बि.जे. मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे.

निवेदनात, जळगाव शहरातील नवीन बी.जे मार्केटमध्ये गेल्या काही वर्षापासून मार्केटच्या उत्तरेकडील मुख्यद्वार, पार्किंगच्या जागेसह मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. याठिकाणी जवळपास १५० ते २०० कारागीर बेकायदेशीरपणे काम करत आहेत. एक कारागीर साधारणत २ ते ३ दुचाकी दुरुस्तीकरिता घेत असल्यामुळे दररोज ४०० ते ५०० गाड्या याठिकाणी दुरुतीसाठी असतात तसेच ५०० ते ६०० लोक या ठिकाणी जमाव करतात. त्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. तसेच कोविड १९ च्या काळामध्ये या ठिकाणी होणारी गर्दी धोकादायक असून आमच्या व ग्राहकांच्या स्वास्थाच्या दृष्टीने धोकेदायक आहे. त्यामुळे आमच्याकडे येणारे ग्राहक व हमाल लोक येण्यास अनुत्सुकता दाखवत आहेत. यामुळे आमच्यावर मानसिक व आर्थिक ताण पडत आहे. मार्केटमधील रहिवाशांना या परिसरात वावरणे सुद्धा कठीण झाले आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

अतिक्रमणधारकांची दादागिरी
आमची वाट मोकळी करून न देणे हे आमच्या मानवी हक्काचे हनन आहे. गाडी दुरुस्त करणाऱ्या अतिक्रमणधारकांना तसेच दुकानदारांना आम्ही समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापालिका आमचे काहीही करू शकत नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यासंदर्भात अनेकवेळा अर्ज, निवेदन देण्यात आले आहेत. त्यानंतरही या अतिक्रमवर कारवाई झालेली नाही. कारवाईचा नुसता देखावा झालेला आहे. अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन करून सुद्धा कोणतीही कारवाई केली जात नाही. बऱ्याचवेळा फोन देखील घेतले जात नाहीत. अतिक्रमण विभागाला या गोष्टीचे गांभीर्य नसून ते केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. दरम्यान, अतिक्रमण विभागाकडून देवान-घेवाणीची शक्यताही नाकारता येत नाही, असा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.

आंदोलनाचा इशारा
गेल्या दोन महिन्यापासून अतिक्रमणधारक न घाबरता रहदारीचा रस्ता पूर्णपणे अडवून व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आमच्याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे आम्ही आर्थिक दृष्ट्या कोलमडून गेलेलो आहोत. हे फक्त महापालिका प्रशासनामुळेच झाले आहे. हे असेच चालत राहिले तर आम्हास कर भरणे पण जड जाईल, याची दक्षता घ्यावी. अतिक्रमणमुळे आमच्या व्यवसायावर दुष्परिणाम होत आहे. अगोदरच कोरोना काळात दुकान बंदमुळे आर्थिक विवंचनेत सापडलो आहोत, त्यात व्यवसाय होणार नाही तर आमच्यावर आत्महत्येची वेळ येईल. याची सर्वस्व जबाबदारी महानगरपालिकेची राहील. व्यावसायिक विविध प्रकारचे कर देत आहेत तरी सुद्धा आम्हास मूलभूत सुविधा सुद्धा पुरविण्यात येत नाहीत. अतिक्रमण करणे हे पण गुन्हयाच्या श्रेणीत येत असल्याने या अतिक्रमण धारकावर महापालिका गुन्हा नोंदवू शकते. मात्र मनपाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून याकडे डोळे झाक केली जात असेल तर अशा विभागाचा फायदा तरी काय? त्यामुळे शासनाच्या पैशांचा चुराडा होत आहे. त्यामुळे हा विभाग पूर्णपणे बंद करून देण्यात यावा, अथवा अतिक्रमण विरुद्ध सातत्याने कारवाई करावी, अन्यथा आम्हाला महापालिका प्रशासनाविरुद्ध जनआंदोलनाचा मार्ग निवडावा लागेल, असा इशाराही व्यापाऱ्यांकडून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी नरेंद्र सपकाळे, रोहित सोनवणे, उमेश सोनवणे, ईश्वर मोरे, ज्ञानेश्वर ताडे, विकास जयस्वाल, उमेश शिंपी, प्रमोद कोळी, उमेश बाविस्कर, सागर महाजन, चैतन्य कोल्हे, शुभम जैस्वाल, कुणाल वर्मा, इरफान शेख, आशिष पाटील, महेश मराठे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज