fbpx

चोऱ्या, घरफोड्या वेळीच रोखण्यासाठी पोलिस निरीक्षकांनी दिल्या खास टिप्स्

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जुलै २०२१ । चोऱ्या, दरोडो रोखण्याचे काम पोलिसांचे असले तरी एक सुजान नागरिक म्हणून दक्ष राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. म्हणून चोऱ्या, दरोडा पडण्याआधीच कोणती आणि कशी काळजी घ्यावी, या विषयी अमळनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी पोस्टर तयार करून रिक्षांवर लावून जनजागृती करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे त्यांच्या या आगळ्या वेगळया उपक्रमाचे नागरिकांकडून उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले आहे.

पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या काळात घरफोड्या, चोऱ्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांनी जनतेला विश्वासात न घेतल्याने गुन्हयांची अधिकची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. परंतु नव्याने नियुक्त झालेले पोलिस निरीक्षक जयापाल हिरे यांनी नागरिकांना विश्वासात घेत गुन्हेगारीवर वचक निर्माण जनजागृतीचे एक विधायक पाऊल उचलेले आहे. शैलेश महिंद यांचे अनमोल सहकार्य लाभले. रिक्षांवर हे जनजागृतीचे बॅनर लावताना पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी हे बॅनर फाटणार नाही किंवा खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी स्वतः विनंतीही केली. या वेळी पोलिस नाईक शरद पाटील,शैलेश महिंद, रिक्षा चालक, मालकसह नागरिक उपस्थित होते.

नागरिकांनी अशी घ्यावी काळजी…..

कोणतीही मोठी चोरी होण्याअगोदर त्या घराची वा दुकानाची चोरट्याकडून दिवसा रेकी / पाहणी केली जाते. त्यामुळे कॉलनीत येणारे फेरीवाले यांना स्टेशनला माहीती दिली आहे काय याबाबत विचारणा करावी. 

तसेच पोलिस स्टेशनला नोंद न करता विक्रीसाठी येणाऱ्या फेरीवाल्यांना मनाई करावी. दिवसा घरास कुलुप असल्याचे पाहुन रात्री चोरटे चोरी करतात. म्हणून बाहेरून घर बंद आहे की नाही हे समजणार नाही, याप्रकारे सेफ्टी डोअर बसवावे.

नागरीकांनी बाहेरगावी जातांना रोख रक्कम व मौल्यवान दागिने बँकेत लॉकर मध्ये ठेवावे . कारण चोरटे घरात प्रवेश केल्यावर सर्वात आधी कपाट तोडतात. 

तेव्हा बाहेरगावी जातांना लॉकरमध्ये दागिने ठेवणे शक्य नसल्यास मौल्यवान वस्तू कपाटाऐवजी अशा ठिकाणी ठेवाव्यात की चोरट्यांना सहज सापडणार नाहीत.

सामुहिक वर्गणीतुन सी.सी.टी.व्ही. बसवा….

नवीन कॉलनीत राहणाऱ्या रहिवाशांनी कॉलनीतील मुख्य रस्त्यांवर सामुहिक वर्गणीतून सी.सी.टी.व्ही.कॅमरे लावावेत. घराच्या वा दुकानाच्या सुरक्षेसाठी सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावताना मुख्य रस्त्याच्या ५० मिटर भाग दोन्ही बाजूने येईल याप्रमाणे कॅमेरे लावावेत. 

कारण चोरटे वाहन ५० फुटावर उभे करतात. रस्त्यावरील कॅमेरेमुळे चोर किती होते, कोणत्या वाहनाने आले , कोणत्या दिशेला गेले, बाहेर किती चोरटे थांबले होते ही माहिती पोलिसांना मिळून गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता वाढते. ज्या कॉलनीत, गल्लीत, चौकात मुख्य रस्त्यांवर सी.सी.टी.व्ही कॅमेरे आहेत, त्या भागात चोरी होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तसेच वाहनेही सुरक्षित राहतात.

पथदिवे सुरू ठेवावीत….

बऱ्याच गल्लीत , कॉलनीत रात्री अंधार असतो. याचा फायदा चोरटे घेतात. तेव्हा नगरपालिका वा ग्रामपंचायत यांचेवर विसंबून न राहता प्रत्येकाने घराबाहेरील लाईट रात्री सुरू ठेवावेत वा सार्वजनिक पथ दिवे सुरळीत चालु आहेत की नाही, याची वेळोवेळी खात्री करावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज