‘एलसीबी’चा जुना पायंडा मोडणार, राजकीय वशिलेबाजी थांबणार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जिल्हा पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एलसीबीला बदली करून घेण्यासाठी अनेकांमध्ये चुरस आहे. आजवरचा इतिहास लक्षात घेता ज्याचा तगडा राजकीय वशिला त्याची लवकर वर्णी असे होते. बदल्यांमध्ये यावर्षी जरा बदल पाहायला मिळणार पोलिस अधीक्षकांनी राजकीय वशिलेबाजीला आळा घालण्यासाठी प्रत्येक विभागातून काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांची नावे मागविली आहे.

जिल्हा पोलीस दलातील सर्वाधिक चर्चेत असलेला विभाग म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा आहे. संपूर्ण जिल्ह्यावर कमांड असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेत आपली वर्णी लागावी त्यासाठी अनेक पोलीस कर्मचारी राजकीय वशिलेबाजीचा उपयोग करतात. स्थानिक गुन्हे शाखेमध्ये काम करण्याची एकदा तरी संधी मिळावी अशी अनेक कर्मचाऱ्यांची इच्छा असते परंतु प्रत्येकाचीच इच्छा पूर्ण होते असे नाही. दरवर्षी पोलिसांच्या बदल्या होतांना स्थानिक गुन्हे शाखेत आपली वर्णी लागावी यासाठी भाऊ, दादा, आप्पा, मामा, काका इतकंच काय तर मंत्र्यांकडूनही शिफारस करण्यात येते. वैयक्तिक कामगिरीच्या बळावर एलसीबीमध्ये स्थान मिळवणारे मोजके तर वशिलेबाजीने आलेल्यांची संख्या अधिक असते.

जिल्हा पोलीस दलात पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होत असून स्थानिक गुन्हे शाखेत वैयक्तिक कामगिरी बजावणाऱ्या दमदार कर्मचाऱ्यांना संधी मिळावी यासाठी पोलिस अधीक्षकांनी नवीन कल्पना शोधली आहे. जिल्हाभरातील उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची वैयक्तिक कामगिरी, शिक्षा आणि आजवर मिळालेल्या बक्षिसाची त्यांना फोन करून माहिती घेतली जात आहे. प्रत्येक उपविभागीय अधिकाऱ्याकडून सुचविलेल्या दोन योग्य कर्मचाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेत संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्या तरी अधिकाऱ्यांनी माहिती घेतल्यानंतरही इच्छुकांची भली यादी मोठी तयार झाली असून त्यातून एलसीबीला योग्य न्याय देऊ शकतील असे चेहरे शोधण्याची क्लिष्ट प्रक्रिया पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्यासह वरिष्ठांना पार पाडावी लागणार आहे. राजकीय शिफारसीने आलेले चेहरे बाजूला ठेवत खरोखर योग्य कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात आल्यास गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण आणखी वाढू शकेल. अधिकाअधिक गुन्हे उघड झाल्याने जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा पुन्हा उंचावेल यात शंका नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar