जळगाव विमानतळावरून लवकरच पुणे, इंदौर सेवा

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२१ । जळगाव पुणे आणि इंदौर सेवा सुरू करणे, अजिंठा ते जळगाव हेलिकॉप्टर सेवा, जळगाव विमानतळावर मंजूर असलेल्या हेलिकॉप्टर व विमान पायलट प्रशिक्षण केंद्राला गती देणे, शेतमाल, नाशवंत व किमती मालाची देशात व देशाबाहेर आयात निर्यात करण्यासाठी कार्गो लॉजिस्टिकची निर्मिती करणे, मोठ्या आकाराची विमाने थांबण्यासाठी धावपट्टीची लांबी वाढवणे यासह विविध विषयांवर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी चर्चा झाली असून केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही यावर सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने लवकरच जळगाव विमानतळावरून पुणे व इंदौर प्रवासी सेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी दिली आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेश पाटील यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची त्यांच्या दिल्ली कार्यालयांमध्ये भेट घेतली यावेळी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री सिंधिया यांनी जळगाव विमानतळाचा चौफेर विकास करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करून माहिती जाणून घेतली. जळगाव विमानतळावर रात्री विमान उतरण्याची व्यवस्था कार्यान्वित झाल्याने प्रसंगी मोठ्या आकाराची विमाने जळगाव विमानतळावर उतरण्यासाठी धावपट्टीची लांबी वाढवण्यात यावी, अशी विनंती खासदार उन्मेश पाटील यांनी केली होती. ना. सिंधिया यांनी यावर तातडीने कार्यवाहीचे संकेत दिले. जळगाव विमानतळावर वस्तु साठवण्यासाठी व्यवस्था असल्याने कार्गो लॉजिस्टिक सेवा सुरू केल्यास शेतमाल, नाशवंत व किंमती वस्तूंची देशात व देशाबाहेर आयात निर्यात करण्यासाठी येथून सुविधा उपलब्ध व्हावी. यांचा मोठा लाभ स्थानिक उद्योजकांना होईल. तसेच महत्वाचा जळगाव ते पुणे व जळगाव ते इंदौर प्रवासी विमान सेवा सुरू व्हावी, यासाठी येत्या दहा दिवसात गती देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री सिंधिया यांनी दिले आहेत, असेही खा. पाटील यांनी सांगितले.

अजिंठा-जळगाव हेलिकॉप्टर सेवा
केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी खासदार उन्मेश पाटील यांच्याशी मराठीत संवाद साधत जळगाव हेलीपोर्ट सेवा सुरू करण्यासंदर्भात चर्चा करीत अधिक माहिती जाणून घेतली. ही सेवा सुरू करण्यासाठी मंत्रालय आग्रही आहे. त्यामूळे जळगाव विमानतळ हे लवकरच देशाच्या नकाशावर अजिंठा हेलीपोर्ट सेवेमुळे चर्चेत येईल, असे खासदार उन्मेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज