गोणीभर चप्पल चोरले, तिघांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१ । शहरातील फुले मार्केट परिसरात चप्पल विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याच्या गोणीभर चप्पल, सॅंडल लंपास केल्याचा प्रकार मंगळवारी घडला होता. शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने एकाच दिवसात छडा लावत तिघांच्या मुसक्या आवळल्या असून मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी जुबेर युसूफ शेख वय-२७ हा फुले मार्केट परिसरात हातगाडीवर चप्पल, सॅंडल विक्रीचा व्यवसाय करतो. मंगळवार दि.२८ रोजी दुपारी १२ वाजता काँग्रेस भवन, फुले मार्केट गेट जवळ दुकान लावले होते. दुपारी १२.३० च्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाल्याने सर्व माल ६ गोणीत भरून त्याने समोर असलेल्या दु.क्र.१२८ च्या बाहेर ठेवून घरी निघून गेलो.

दुकान मालक अजय चौधरी यांना सांगून जुबेर घरी गेला आणि सायंकाळी ५ वाजता परत आला. दुकानाबाहेर ठेवलेल्या गोण्या पहिल्या असता ६ पैकी एक गोणी दिसून आली नाही. गोणी चोरी झाल्याची खात्री पटल्यावर त्यांनी १५ हजार २१२ रुपयांच्या चप्पल चोरी झाल्याची तक्रार शहर पोलिसात दिली होती.

घरात माळोच्यावर फेकले होते सामान

शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करीत होते. पोलीस कर्मचारी किशोर निकुंभ यांनी तपास केला असता घटनेच्या दिवशी किशोर बाविस्कर हा एक गोणी घेऊन जात असताना त्याला काही नागरिकांनी हटकले असल्याची माहिती मिळाली होती. संशयितांच्या वर्णनावरून शोध घेतला असता महेश राजेंद्र तायडे रा.२१ वाल्मिक नगर, शोएब शेख अख्तर वय-३३ रा.रथ चौक, किशोर जानकीराम बाविस्कर वय-३१ रा.वाल्मिक नगर यांची नावे निष्पन्न झाली. पोलीस कर्मचारी किशोर निकुंभ, संतोष खवले, योगेश इंधाटे, उमेश भांडारकर यांच्या पथकाने महेश तायडे याच्या घरी चौकशी केली असता त्याने घराच्या माळोच्यावर काहीतरी गोणी फेकल्याचे समजले. पोलिसांनी तपासणी केली असता चोरलेला मुद्देमाल मिळून आला. परिसरात तिघे फिरत असल्याची माहिती मिळाल्याने तिघांना जेरबंद करण्यात आले आहे.

एकाला पकडले होते. दुसऱ्याने पळ काढला होता. वर्णनावरून शोध घेतला असता नावे निष्पन्न झाले. याप्रकरणी पुढील तपास  किशोर निकुंभ करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज