सायकलींग खेळाच्या प्रवेशासाठी ८ रोजी नैपुण्य चाचणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । आंतराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्य निपुणता केंद्रातंर्गत सायकलिंग या खेळाकरिता निपुणता केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या खेळात ज्या खेळाडुंची जन्मतारीख १ जानेवारी २००७ ते ३१ डिसेबर २००९ या दरम्यान आहे, अशा खेळाडुंची सायकलिंग या खेळाच्या तज्ञ चाचणी समितीमार्फत समक्ष गुणानुक्रम देवून प्रवेश निश्चित केला जाणार आहे. या खेळाच्या प्रवेशाकरिता जिल्हास्तरावर ८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हास्तरावर मुलांकरिता १६०० मीटर धावणे व मुलीसाठी ८०० मीटर धावणे तसेच दोघांकरिता उभी लांब उडी, उभी उंच उडी व खेळाडुंची उंची अशा चाचण्यामधून गुणानुक्रमे प्रथम २ मुले व २मुलींची निवड करुन राज्यस्तरावर चाचणीकरिता पात्र ठरणार आहेत. त्याचप्रमाणे जे खेळाडू सायकलिंग या खेळात आपल्या जिल्हाकडून राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेले आहेत. अशा खेळाडूंना थेट राज्यस्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्यांकरिता पाठविण्यात येणार आहे. खेळाडुंनी राज्यस्तरावर जातांना सायकलिंग या खेळाचे राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतील क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्रांची छायांकित प्रत व मुळ प्रत सोबत न्यावयाची आहे. राज्यस्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्यांकरिता पात्र ठरणाऱ्या व थेट निवड झालेल्या खेळाडुंनी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवासस्थान, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे उपस्थित रहावे. त्यांच्या चाचण्या ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सायकलिंग वेलोड्रॉम, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे येथे घेण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, संस्था, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील शाळा, विविध क्रीडा संघटना व क्रीडा मंडळे यांनी जिल्हास्तरावर सायकलिंग या खेळाच्या क्रीडा नैपुण्य चाचण्यांकरिता इच्छुक सहभागी मुले, मुली खेळाडुंनी आपले नाव, जन्मदिनांक (आधारकार्ड/जन्मदाखला सह) इयत्ता, पत्रव्यवहाराचा पत्ता, संपर्क क्रमांकसह व खेळात क्रीडा कामगिरी असेल तर क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्रांवर छायांकित प्रती इत्यादी माहितीसह चाचणी कार्यक्रमानुसार उपस्थित राहावे, अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज