फोटो पाहण्याच्या बहाण्याने भावानेच लांबवले बहिणीचे मंगळसूत्र

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१। यावल तालुक्यातील हरिपुरा येथे बहिणीकडे आलेल्या भावाने तुझ्या पेटीतील वडिलांचा फोटो दाखव असा बहाणा करून पेटीतील ३ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भाच्याने दिलेल्या फिर्यादीवरून मामाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू बारकू जाेगी (रा. एकलग्न, ता.धरणगाव) हा दि.१८ ऑक्टोबर राेजी हरिपुरा (ता. यावल) येथील बहिणीकडे गेला होता. यावेळी त्याने बहिणीला तुझ्या पेटीतील वडिलांचा फोटो दाखव असे सांगितले. बहिणीनेही सख्खा भाऊ असल्याने त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याला पेटीमध्ये ठेवलेला फोटो दाखविला. मात्र, यावेळी राजू जाेगी याने बहिणीचे लक्ष चुकवून पेटीतील पंधरा हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास करून पसार झाला.

भावाने मंगळसूत्र लंपास केल्याचे लक्षात आल्यानंतर बहिणीने त्याला वारंवार मंगळसुत्र परत कर असे सांगितले. मात्र त्यानंतरही त्याने मंगळसुत्र परत केले नाही. याप्रकरणी राजेंद्र आहिरे यांच्या फिर्यादीवरून त्याचा मामा राजू जाेगी याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज