साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले जळगावातील जागृत देवस्थान ‘श्री साईबाबा मंदिर’

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । जळगाव शहरातील बळीरामपेठ, तहसील कार्यालय सर्वांनाच परिचित आहे. तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले साईबाबा मंदिर मात्र फारसे प्रचलित नाही. जामनेर येथील निस्सीम भक्त तहसीलदार नानासाहेब चांदोरकर यांना उदी देण्यासाठी आलेल्या रामगीरबुवा गोसावी यांना रेल्वे स्थानकापासून पुढे जावे कसे असा प्रश्न पडला. तेव्हा राजपूत टांगेवाल्याच्या वेशात येत साईबाबांनी पुढील मार्ग दाखविला. साई चरित्राच्या ३३ व्या अध्यायात नोंद असलेला हा इतिहास मंदिराच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. साईबाबांच्या पदस्पर्शाने जळगाव नगरी पावन झाली असून बळीराम पेठेतील साईबाबा मंदिराला ६७ वर्षांचा इतिहास लाभला आहे.

जाणून घेऊ साईबाबा मंदीराचे महात्म्य व इतिहास

जळगांव शहरातील एक पुरातन व जागृत देवस्थान म्हणून बळीराम पेठेतील पूर्वाभिमुख साईबाबा मंदीर ओळखले जाते. मंदिराला ६७ वर्षाचा इतिहास लाभला आहे. शहरातील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या या मंदीराची जागा साईबाबांचे पदस्पर्शाने पावन झालेली आहे. मंदीराच्या जागेचा संदर्भ थेट साई चरित्रामधील “उदीचा चमत्कार” या ३३ व्या अध्यायात आलेला आहे. हा संदर्भ असा कि “बाबांचे निस्सीम भक्त जामनेरचे तहसीलदार नानासाहेब चांदोरकर यांना उदी नेवून दे असे बाबांनी रामगीरबुवा गोसावी यांना शिर्डीत सांगितले. रेल्वेने जळगावात स्टेशनवर आले असता रामगीरबुवा यांच्यासमोर मोठा प्रश्न पडला. बाबांनी दिलेली उदी आणलेली तर आहे मात्र जळगांवहून जामनेरला पुढे कसे जावे हा विचार ते करू लागले. तोच रामगीरबुवा यांना एक टांगा जळगांव रेल्वे लाईनजवळ दिसला. हा टांगा आज बळीराम पेठेतील साईबाबा मंदीर आहे त्याच जागेवर उभा होता व साईबाबा राजपूत टांगेवाल्याच्या वेषात होते. ‘मला नानासाहेबांनी पाठविले असे सांगून टांगेवाला वेषातील सदगुरु साईबाबांनी गोसावी रामगीरबुवा यांना आपल्या टांग्यातून जामनेरला घेवून गेले व तेथून अदृश्य झाले” असा पौराणिक संदर्भ असलेले साईबाबा मंदीर सन १९५६ मध्ये बांधण्यात आले’ आज ज्या जागेवर साईबाबा मंदीर आहे त्या ठिकाणी पूर्वी टांगा स्टॅन्ड होते अशी जळगांव तहसील कार्यालयात शासकीय नोंद आहे.

साईबाबांनी दिला दृष्टांत आणि मंदिराची झाली उभारणी

श्री.नथ्थूशेठ वडनेरे यांना पुढे साईबाबांनी दृष्टांत दिला आणि त्यानंतर सन १९५५ मध्ये नथुशेट वडनेरे, श्री चिंतामणराव मिस्तरी, राम रतन तिवारी, बळवंतलाल मोहनलाल तंबाखुवाले व भाऊसाहेब काशिनाथ लाठी यांनी मंदीराचे मागील भागात निंबाचे झाडाखाली साईबाबांची लाकडी मुर्ती ठेवली व तेथे मुर्तीची पुजा-अर्चा सुरु केली. आज ही लाकडी मुर्ती डॉ.मधुकर लाठी यांच्या जळगांवच्या प्रभात कॉलनीमधील निवासस्थानी आहे. नंतर भाऊसाहेब काशिनाथ लाठी, नथुशेट वडनेरे, चिंतामणराव मिस्तरी यांनी साईबाबा मंदीर बांधण्याचा संकल्प केला व शहरातील दानशूरांच्या सहकार्याने शके १८९१ (सन १९६५) चैत्र शुद्ध नवमीस मंदीर गाभाऱ्याचे काम पूर्ण केले. सन १९७० साली गाभाऱ्यासमोर एक हॉल बांधण्यात आला. सन २००३ मध्ये मंडळातर्फे मंदीराचे पहिल्या हॉल लगत नवीन हॉलचे बांधकाम शहरातील सुप्रसिध्द आर्किटेक्ट प्रकाश गुजराथी यांचे मार्गदर्शनाखाली व प्रशांत गुजराथी यांचे देखरेखीत पूर्ण करण्यात आले. सन २०१७ मध्ये मंदीराचा कळस उत्कृष्ट  कलाकुसरीसह वाढवून मंदीर सुशोभीकरणाचे काम अध्यक्ष ज्ञानेश्वर काशिनाथआप्पा बारशे व विश्वस्त मंडळ सदस्यांचे पुढाकाराने करण्यात आले. कळस सुशोभीकरणाचे संपूर्ण काम न्यासाचे आजीवन सभासदांच्या ऐच्छिक देणगीमधूनच करण्यात आले. “साई संजीवन समाधी शताब्दी वर्षात हे काम पूर्णत्वास गेले हा जणु एक साई संकेतच म्हणावा लागेल.

असंख्य भाविकांची मनोकामना होते पूर्ण

सन १९७३ मध्ये सहाय्यक धर्मादाय आयुक्त, जळगांव यांचेकडे “श्रीसाई सेवा मंडळ” या नावाने संस्थेची नोंदणी झाली आहे. श्रीसाई सेवा मंडळाचे कार्यक्षेत्र हे शहरापुरतेच मर्यादित आहे. बळीराम पेठेतील साईबाबा मंदीर आज शहरातील व जिल्हयातील भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे. साईबाबांच्या विलोभनीय मुर्तीचे दर्शन मंदीरात येणा-या असंख्य भाविकांना होत असते. साई श्रध्देने आपली मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव असंख्य भाविकांना आलेला आहे व येत आहे. मंदीराचे पहिले पुजारी शंकर जोशी यांनी आयुष्यभर (दि.३१ मार्च १९९१ अखेर) साईबाबांची सेवा केली. सध्या पुजारी सेवक म्हणून श्रीराम गणेश जोशी हे सेवा करीत आहेत. साईबाबा मंदीरातच उत्तरेकडील भागात शेगांवचे संत गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सन १९८० मध्ये करण्यात आली असून त्यामुळे एकाच वेळी भाविकांना दोन समकालीन संतश्रेष्ठांचे दर्शन घेता येते हे या मंदीराचे प्रमुख वैशिष्ठ मानले जाते.

नामवंत कलावंतांच्या गायन मैफिली, दिग्गजांचे कीर्तन

साईबाबा मंदीरात नित्यनेमाने प्रातः आरती, मध्यान्ह आरती, सायं, आरती होते. दर गुरुवारी व एकादशीस श्रीसाई सेवा भजनी मंडळातर्फे दुपारी मंदीरात शहरातील साईभक्तातर्फे आरती असते. गुरुवारी भजन, प्रवचन होत असते. भाविकांना आरतीचे मानकरी करण्यात येते व या मानकरीतर्फे सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते. दर गुरुवारी सायंकाळी आरतीच्या वेळेस भाविकांचे होणाऱ्या गर्दीमुळे मंदीर परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले दिसून येते. नामवंत व नवोदित कलावंतांचे गायनाचे मैफिली हे देखील या मंदीराचे वैशिष्ट्ये असून शहरातील सर्व स्थानिक कलाकारांशिवाय डॉ.राजा काळे (मुंबई), मंजिरी कर्वे आलेगांवकर (पुणे), पं.चंद्रशेखर वझे (मुंबई), अश्विनी टिळक (पुणे) कविता खरवंडीकर (पुणे), पं.विजय कोपरकर (पुणे), गिरीश गोसावी (औरंगाबाद), गौतम काळे (इंदौर), शिवदास देगलूरकर (अंबेजोगाई), दिलीप दोडके (औरंगाबाद), अवीराज तायडे (नासिक), नुपूर गाडगीळ (पुणे), भाग्यश्री देशपांडे (मुंबई) इ. गायकांनी आपले गायन साई सेवा म्हणून मंदीरात सादर केले आहे. “दरबार साईंचा” या बीड येथील सुप्रसिध्द कथाकार श्री साई गोपाल देशमुख यांच्या साईकथेचा लाभ देखील असंख्य भाविकांनी या मंदीरात घेतला आहे. ह.भ.प.आफळेबुवा, ह.भ.प. मुकीमबुवा रावेरकर, ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा, ह.भ.प. दीनानाथजी गंधे महाराज, ह.भ.प. उपासनी महाराज, ॲड.रेणु रामदासी, बाल कीर्तनकार निनाद कुलकर्णी आदी मान्यवरांनी आपली कीर्तनसेवा मंदीरात रुजू केली आहे.

६७ वर्षापासून निरंतर अन्नदान सेवा

“विजया दशमी” हा दिवस साईबाबा पुण्यतिथी दिवस असल्याने गत ६७ वर्षापासून श्रीसाईबाबा पुण्यतिथी महोत्सव मंडळातर्फे मंदीरात साजरा केला जात आहे. या महोत्सवात भजन, गायन, कीर्तन, प्रवचन, कथा-कथन इ. कार्यक्रम होत असतात. विजयादशमीचे दिवशी भिक्षेतून आणलेल्या व देणगी रुपाने मिळालेल्या धान्यातून मंदीरासमोर गोरगरिबांना नैवेदय-अन्नदान केले जाते. ६७ वर्षापूर्वी अन्नदान सुरु करणारे श्रीसाई सेवा मंडळ हे शहरातील पहिले मंडळ होते. आश्विन शु. एकादशीस शहरातील प्रमुख मार्गावरुन सदगुरु पादुका सर्वोदय पालखी मिरवणुक गत सहा दशकापासून सुरु असून आश्विन शु. द्वादशीस गोपालकाला व तीर्थप्रसादाने श्रीसाईबाबा पुण्यतिथी महोत्सवाची सांगता होते. संत गजानन महाराज प्रकट दिन, महाशिवरात्र, श्रीराम नवमी, गुरु पौर्णिमा, ऋषी पंचमी, श्रीकृष्ण जयंती व दत्त जयंतीनिमित्त देखील मंदीरात धार्मिक कार्यक्रम होत असतात.

असे आहे विश्वस्त मंडळ

जानेवारी २०२१ ते जानेवारी २०२४ या अवधीसाठीचे विश्वस्त मंडळात ज्ञानेश्वर काशिनाथआप्पा बारशे (अध्यक्ष), रमेश चिमणराव दलाल, (उपाध्यक्ष), सतीश आत्माराम खलाणे, (सचिव), विजय काशिनाथ देशमुख (सह-सचिव), पारिजात श्रीधर घारपुरे, (कोषाध्यक्ष), आशिष शांताराम जोग (जनसंपर्क अधिकारी), आत्माराम तुकाराम माळी, (सदस्य), जगन्नाथ मुरलीधर तळेले, (सदस्य), संजय मोहनलाल जैन, (सदस्य), अनिरुध्द मदन कोटस्थाने, (सदस्य), व अजय राजेंद्र अग्रवाल, (सदस्य) म्हणून सक्रीयरित्या कार्यरत असून आपली सेवा सदगुरु चरणी देत आहेत.

पहा विशेष व्हिडीओ :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -