साक्षात ब्रम्हा विष्णु महेश येथे लपून बसले होते : मनःशक्तीपीठ श्रीमनुदेवी

जळगाव लाईव्ह न्यूज । देवी भागवत पुराणात असा उल्लेख आहे कि ब्रम्हा विष्णु महेश या देवांवर एक मोठे संकट आले असता, राक्षसांपासून सुटका करण्यासाठी या तिन्ही देवतांना गुप्त ठिकाणी म्हणजे सातपुडयाच्या खोल दरीत गुहेत येऊन बसले. ते गुप्त ठिकाण म्हणजे श्री मनुदेवीचे मंदिर होय.

श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्राविषयी असलेल्या दंतकथेप्रमाणे सर्व देवांनी मनाने एक विचार करीत असता, लपलेल्या गुहेत श्वासाने उच्छवासाने एक तेज प्रकट झाले. ती तीव्र तेजस्वी प्रकाशाची ज्योत निर्माण झाली, तो सर्व शक्तीमान प्रकाशाचे देवता मनाचे सामर्थ्य असलेली श्री मनुदेवी प्रकट झाली.

यावेळी देवांनी देवीस विनंती केली की, हे आदिशक्ती, सर्वमान शक्ती श्री मनुदेवी आमच्यावर फार मोठे संकट कोसळलेले आहे. म्हैषासूर राक्षसाने पॄथ्वीवर सर्वत्र धुमाकूळ, अत्याचार सुरु केल्याने आम्हाला हैराण त्रस्त केलेले आहे. म्हणून त्याचा वध करण्यासाठी तू उग्र रूप धारण करुन त्याचा नि:पात करावा. त्यास नष्ट करावे व सर्व जीव सॄष्टीला भय मूक्त करावे. ही सर्व शक्तीची प्रार्थना एकून श्रीमनुदेवी देवांना अभयवचन दिले की, मी लवकरच श्री सप्तश्रॄंग देवीचा अवतार घेऊन, येथूनच धावत जाऊन त्या महिषासुर राक्षसाचा वध करेल.

या अभिवचनानुसार श्रीमनुदेवी ही महिषासुर सैन्याचा वध करीत तापी काठावर वसलेले शिरागड येथे युध्द केले. म्हणून त्या ठिकाणी श्रीमनुदेवीचे स्वरूप शिरागडची अष्टभुजा देवी म्हणून आजही विराजमान आहे. तेथून श्रीमनुदेवीने नांद्रा ( बाजारा ) येथे युध्द केले तेथे ही अष्टभुजादेवीचे मंदिर आहे. नांद्रा येथून पाटणा या ठिकाणी घनघोर युध्द झाल्याने देवीने तेथे विश्रांती घेतलेली आहे. म्हणून श्री पाटणा देवी येथे श्री श्रीमनुदेवीचे स्वरुप अष्टभुजा देवीच्या सुंदर स्वरुपात प्रकट झालेली असून जागॄत ठिकाण झालेले आहे.

तेथूनच श्री मनुदेवीने महिषासुर राक्षसाचा वध सप्तश्रॄंग पर्वतात केल्याने दुर्गम अशा ठिकाणी श्री सप्तश्रॄंग देवीने उग्र स्वरूप धारन करून त्या महाभयंकर राक्षस महिषासुराचा सतत ७ वर्षे घनघोर युध्द करून त्यास नष्ट केलेले आहे. तीच आदिशक्ती म्हणजे श्री सप्तश्रॄंगदेवीचे माहेर हे खानदेश म्हणून सांगतात म्हणजेच सातपुडा निवासिनी श्री मनुदेवीचे स्वरूप होय. अशी ऐकिवात येणारी कथा आहे.

महाराष्ट्रात वैभवशाली, संपन्न सांस्कॄतिक, धार्मिक क्षेत्रात आघाडीचा जिल्हा म्हणजे जळगांव जिल्हा होय. जळगांव जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा हा पर्वत असून सुर्यकन्या तापी नदीचा हा भूसंपन्न परिसर. यावल ते अंकलेश्वर महामार्गावर चोपडा ते यावल राज्य रस्त्याच्या चिंचोली किंनगावच्या पश्चिम दिशेला उत्तरेस आंडगाव फाटा आहे. या आंडगाव फाट्यापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्र अवघे 9 किलोमीटरवर आहे. या आंडगाव फाट्यापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्राकडे जातांना 6 किलोमीटर वर श्री हनुमानाचे मंदिर आहे. श्री हनुमान मंदिरापर्यंतची सडक हि पक्की डांबराची आहे. श्री हनुमान मंदिराजवळ सुंदर पाझर तलाव आहे.

श्री हनुमान मंदिरापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्र हे जवळपास ३ किलोमीटर वर आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदतीने हा 3 किलोमीटरचा कच्चा रस्ता संस्थेने बांधून घेतला आहे. त्यामुळे आता खाजगी वाहने ( टू व्हिलर, आटोरीक्षा, कार, जीप, टॅक्सी इ. ) थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात. जळगांव ते श्रीमनुदेवी मंदिर हे 35 कि. मी. आहे.

श्री मनुदेवी मंदिराचा इतिहास

श्री मनुदेवी क्षेत्राजवळ गेल्यावरच सुरुवातीला भाविकांच्या स्वागताला उंच उंच वॄक्ष सदैव उभे आहेत. श्री ( परशुराम) उभा आहे. अन् हे श्री मनुदेवीचे मंदिर अतिप्राचीन त्यांच्या जुन्या अवशेषावरुन, तेथील उत्खननातून सापडलेल्या मूर्तीवरुन वाटते. या तिर्थक्षेत्राचा शोध सुरुवातीला इ. स. 1251 मध्ये इंगळे घराण्याचे पूर्वज कै. पांडू जीवन इंगळे यांनी घेतल्याचे सांगितले जाते.

या मंदिरापासून सातपुडा पर्वतामध्ये 4 ते 5 कि. मि. अंतरावर गवळी वाड्यांचे अवशेष अजुनही पाहावयास मिळतात. ईश्वसेन राजा या भागात राज्य करीत असतांना त्याने या हेमाडपंथी मंदिराची बांधणी केल्ल्याचे उल्लेख आढळतात. मंदिराभोवती असलेल्या 13 फूट उंचीच्या व 2 कि. मि. लांबीच्या भिंतीच्या विटा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बूरुजांचे काही भाग ढास ळलेले असले तरी सध्या अस्तित्वात असलेल्ल्या अवशेषांवरुन पूर्वीच्या बांधकामाची रचना अथवा मजबुती याविषयी अंदाज करता येतो.

श्री मनुदेवी एक मनःशक्तीपीठ

ज्या भाविकांना स्त्री पुत्र द्रव्यादी गोष्टी प्राप्त करून घेण्याची इच्छा असते, त्यांना उत्तम प्रकारे तोषविणारी, भक्तांकडून पूजा-अर्चा भक्तीपूर्वक करविणारी तूच, तूच इच्छीत वर देतेस, तू यशोदेच्या उदरी अवतार घेतल्यास भाविक तुझी धूप-दीप, नैवैदय, नमस्कार या सामग्रीच्या योगाने पूजा करतील, पॄथ्वीवर लोक तुझी मंदिरे बांधतील. दुर्गा, कुमुदा, चंडिका, कॄष्णा, माधवी, कन्याका, माया, नारायणी, ईशानी, शारदा, अंबिका, भद्रकाली, विजया आणि वैष्णवी अशा नावांनी तुझी मंदिरे-ठिकाणे प्रसिध्द होतील. परंतू मनाची सूप्त इच्छा पुर्ण करणारी, मनातील हेतू पुर्ण करणारी असंख्य भक्त-उपासकांची कुलस्वामिनी श्री मनुदेवी सातपुडा पर्वतात निवास करेल असे श्रीकॄष्णांनी म्हटले होते, अशी आख्यायिका आहे.

श्री मनुदेवी मंदिराचा निसर्गरम्य परिसर

मंदिराच्या तिन्ही बाजूस उंच कडे असून मंदिराच्या समोर अंदाजे 400 फूट उंचीवरुन कोसळणारा धबधबा आहे. वर्षातील 6 ते 7 महिने कोसळणारया या धबधब्याचे पाणी सातपुड्याच्या पायथ्याशी येते. येथे शासनाच्या मदतीने पाझर तलाव बांधण्यात आहे. तलावाशेजारीच छोटेशे सुंदर हनुमानाचे मंदिर आहे.

shree manudevi

त्यामुळे मनुदेवीचा परिसर रमणीय व मनमोहक असा झाला आहे. तसेच येथे भाविंकाबरोबर पर्यटक, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, सहली मोठ्या संखेने येत असतात. या तिर्थक्षेत्राचा पर्यटन स्थळ म्हणूनही विकास व्हावा अशी अपेक्षा भाविंकाकडून व विश्वस्त मंडळाकडून महाराष्ट्र शासनाकडे व्यक्त केली जात आहे.

श्रीमनुदेवीच्या दर्शनाची योग्य वेळ

कोणतीही काळ दर्शनास चांगला पण योग्य वेळ ही आक्टोंबर ते डिसेंबर महिन्यात कारण या दरम्यान तुम्ही निर्सग सौदर्य आणि वाहता धबधबा , नदी पाहू शकतात. प्रत्येक वर्षाच्या चैत्र व माघ शुद्ध अष्टमी या दिवशी देवीवर ‘नवचंडी’ महायज्ञाचे आयोजन केले जाते. संपुर्ण मार्गशीर्ष महिना व श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येच्या दुसर्‍या दिवशी यात्रा असते. अश्वीन महिन्यात नवरात्रोस्तव तसेच देवीची यात्रा असते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज